आद्यकवी मुकुंदराज यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी
By Admin | Updated: December 24, 2016 21:54 IST2016-12-24T21:36:34+5:302016-12-24T21:54:05+5:30
अंबाजोगाई : आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती

आद्यकवी मुकुंदराज यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी
अंबाजोगाई : आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या निमित्ताने समाधी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुुकुंदराज यात्रेनिमित्त पंचक्रोशीतून दर्शनासाठी आलेल्या दिंडीतील वारकरी, महिला, बालगोपाळ व सर्व भाविकांना येथील माहेश्वरी परिवाराच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. जवळपास १० हजार भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. तसेच समाधी परिसरात मंदिराचे पुजारी सारंग पुजारी यांच्या वतीनेही दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शनानंतर पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
स्वयंसेवक म्हणून वकील संघाने पार पाडली जबाबदारी
मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पोलिस प्रशासनाला सहकार्य म्हणून वकील संघाच्या सर्व सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. अॅड. शरद लोमटे, अॅड. किशोर गिरवलकर, अॅड. अण्णासाहेब लोमटे, अॅड. लालासाहेब जगताप, अॅड. जयसिंग चव्हाण, अॅड. सुनिल पन्हाळे, अॅड. संजय डिघोळे, यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातून छोटछोट्या दिंड्या
मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागातून छोटछोट्या दिंडीमध्ये टाळ-मृदंग व ज्ञानोबा-तुकाराम यांच्या नामाचा घोष करत वारकरी, महिला, यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
बालगोपाळांनी लुटला यात्रेचा आनंद
मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेच्या निमित्ताने समाधी परिसरात आनंदनगरी, रहाटपाळणे व विविध खेळण्या आल्या होत्या. या सर्व खेळण्याचा बालगोपाळांनी लुटला. पंचक्रोशीतील महिला, भाविक यात्रेत सहभागी झाले होते. (वार्ताहर)