भूमिपुत्रांच्या ‘एंट्री’ने दिग्गजांपुढे आव्हान
By Admin | Updated: October 3, 2014 23:58 IST2014-10-03T23:58:40+5:302014-10-03T23:58:40+5:30
पांडुरंग खराबे , मंठा मंठा-परतूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून यावेळी मंठा तालुक्याचे भूमिपूत्र, उद्योजक सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेकडून तर गायक प्रा. राजेश सरकटे

भूमिपुत्रांच्या ‘एंट्री’ने दिग्गजांपुढे आव्हान
पांडुरंग खराबे , मंठा
मंठा-परतूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून यावेळी मंठा तालुक्याचे भूमिपूत्र, उद्योजक सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेकडून तर गायक प्रा. राजेश सरकटे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात उतरले असल्याने प्रस्तापित मातब्बर पुढाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मंठा-परतूर विधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक दशकांपासून मंठा तालुक्यातून प्रभावी पक्षाचा वजनदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला नव्हता. माजीमंत्री रामप्रसाद बोराडे, माजी आ. भगवानराव बोराडेनंतर विधानसभेचे नेतृत्व आजपर्यंत परतूर तालुक्याकडे असून यावेळी मात्र शिवसेनेकडून उद्योजक सोमनाथ साखरे तर राष्ट्रवादीकडून गायक प्रा. राजेश सरकटे निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या मतदार संघातील दिग्गज कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश जेथलिया, मनसेचे बाबासाहेब आकात, भाजपाचे बबनराव लोणीकर या तीनही अनुभवी दिग्गजांपुढे भूमिपूत्रांचे आव्हान उभे राहिले आहे.
साखरे यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. तर प्रा. सरकटे यांनी मातोश्री हंसादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली वर्षभर सामाजिक उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या निवडणुकीत विद्यमान आ. सुरेशकुमार जेथलिया कॉँग्रेसकडून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून त्याकडे विकासाबरोबरच मोठी कार्यकर्त्यांची फळी जमेची बाजू मानल्या जाते. तर मनसेचे उमेदवार बाबासाहेब आकात यांच्याकडे शिक्षण संस्थेचे जाळे, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, सहकारी संस्था ताब्यात असल्याने त्यांना प्रबळदावेदार मानले जाते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी दोनवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करुन तळागाळापर्यंत पक्ष संघटन मजबुत करुन शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने करुन दमदार नेतृत्व अशी छबी निर्माण केली असल्याने त्यांच्याकडे या जमेच्या बाजू आहेत. असे असले तरी गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्याकडे चला, गड्या आपुला गाव बरा म्हणून कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे नशिब अजमावणारे शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीचे सरकटे मंठा-परतूर समृध्द करण्यासाठी राजकीय आखाड्यात उतरले आहेत.
पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या मातब्बरांशी हे कशी जुंज देणार, कोण बाजी मारणार, राजकीय डावपेच काय असणार याबाबत चर्चा रंगत आहेत.
एकूणच नवखे व दिग्गज यांच्या लढतीकडे संपूर्ण मतदार संघाचे चित्र लागून आहे. ठिक ठिकाणी चर्चांना उधाण आले आहे.