अध्यक्षपदी बिराजदार तर शिंदे उपाध्यक्ष
By Admin | Updated: May 20, 2015 00:18 IST2015-05-20T00:16:40+5:302015-05-20T00:18:44+5:30
उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतही अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपाच्या उमेदवारांनी विरोधी काँग्रेस- शिवसेनेच्या उमेदवारांना

अध्यक्षपदी बिराजदार तर शिंदे उपाध्यक्ष
उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतही अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपाच्या उमेदवारांनी विरोधी काँग्रेस- शिवसेनेच्या उमेदवारांना ९- ६ अशा मतांच्या फरकाने धूळ चारत विजयश्री खेचली़ बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाचे कैलास शिंदे यांची वर्णी लागली आहे़ पक्षीय बलाबल पाहता उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी असतानाही काँग्रेस - शिवसेनेने विरोधासाठी विरोध करीत निवडणुकीत उमेदवार उभा केल्याची चर्चा होती़
राष्ट्रवादीने ही निवडणूक भाजपाला सोबत घेवून लढविण्याचा निर्णय घेतला तर भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेने काँग्रेसच्या ‘हातात’ ‘धनुष्य’ देवून ‘डीसीसी’ला टार्गेट केले होते़ माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपाचा पॅनल तर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस- शिवसेनेचा पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरला होता़ निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचार सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या मोठ्या फैरी झडल्या होत्या़ ९ मे रोजी झालेल्या मतमोजणीत मतदारांचा कौल राष्ट्रवादी- भाजपाच्या पारड्यात पडला़ राष्ट्रवादीचे आठ, भाजपाचा एक, शिवसेना- काँग्रेसचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले़ निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने मागील अनुभव पाहता सर्वच संचालकांना सहलीवर पाठविले होते़ जिल्हा बँकेच्या सभागृहात मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती़ निवडणूक निर्णय अधिकारी एस़पी़बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार तर उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे कैलास शिंदे यांचा अर्ज दाखल झाला़ विरोधी शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील यांचा तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला तलाक देवून शिवसेनेच्या तंबूत गेलेले संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया घेण्यात आली़ त्यानंतर झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश बिराजदार यांना ९ तर शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना ६ व उपाध्यक्षपदाचे भाजपाचे उमेदवार कैलास श्ािंदे यांना ९ तर शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांना ६ मते पडली़ मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी सुरेश बिराजदार तर उपाध्यक्षपदी कैलास शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर केले़ निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़ यावेळी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह राष्ट्रवादी- भाजपाचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते़ सहाय्यक म्हणून बँकेचे कार्यकारी संचालक एच़व्ही़भुसारे, शिंदे यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी आयोजित विशेष सभेत झालेल्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादीचे नूतन संचालक शिवाजीराव विठ्ठल भोईटे, सुग्रीव आत्माराम कोकाटे व प्रवीणा हणमंत कोलते यांनी प्रारंभी सभागृहात हजेरी लावली़ त्यानंतर ते तेथून बाहेर गेले़ अर्ज दाखल, छाननी, माघारी घेण्याचा वेळ निघून गेल्यानंतर मतदान प्रक्रियेदरम्यान या तिन्ही संचालकांनी सभागृहात हजेरी लावली़ इतर संचालक सभागृहात असताना राष्ट्रवादीचे तीन संचालकांना सभागृहाबाहेर का ठेवण्यात आले ? हा चर्चेचा विषय होता़
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सुरेश बिराजदार म्हणाले, आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ त्यासाठी थकीत कर्जवसुलीसाठी विशेष मोहीम राबविणे, केंद्र, राज्य शासनाकडे बँकेचे असलेले कोट्यवधी रूपये आणणे, शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़ मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरवत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीशी युती करून निवडणूक लढविण्यात आली आहे़ मतदारांनी राष्ट्रवादी-भाजपाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून सर्वाधिक उमेदवार विजयी केले आहेत़ तर संचालकांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे़ केंद्र, राज्यातील मंत्र्यांकडे जिल्हा बँकेला मदत मिळावी, यासाठी एकत्रित पाठपुरावा करण्यात येणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन उपाध्यक्ष कैलास शिंदे म्हणाले़
निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस- शिवसेनेचे संचालक सभागृहातून बाहेर आले़ ते वाहनाकडे जात असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली़ राष्ट्रवादीची घोषणाबाजी जिव्हारी लागल्याने संजय देशमुख, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह जमाले हे जमावापुढे आले़ त्यावेळी काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ मात्र, उपस्थित काही पदाधिकाऱ्यांसह पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला़
४निवडणुकीचा निकाल जाहीर होताच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष केला़ त्यानंतर पदाधिकारी, नेतेमंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़