‘त्या’ सायकली चार महिन्यांपासून पडून
By Admin | Updated: January 7, 2017 00:08 IST2017-01-07T00:05:32+5:302017-01-07T00:08:27+5:30
लातूर : पोलिसांनी जप्त केलेल्या जवळपास ४० सायकली गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत.

‘त्या’ सायकली चार महिन्यांपासून पडून
लातूर : जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने एका सायकल चोराकडून जप्त करण्यात आलेल्या तब्बल ३५ सायकली आणि शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेल्या जवळपास ४० सायकली गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून संबंधित सायकलींच्या मालकांचा शोध सुरू आहे. मात्र चार महिन्यांनंतरही या सायकलींचा गुंता सुटला नाही.
लातूर शहरातील विविध शाळा-महाविद्यालये आणि खासगी शिकवणीच्या परिसरात विद्यार्थ्यांनी पार्किंग केलेल्या सायकलींवर नजर ठेवून सायकल चोरणाऱ्या टोळीने शहरातील शेकडो सायकली लंपास केल्या आहेत. सायकल चोरी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात किरकोळ फिर्याद म्हणून मिळणाऱ्या वागणुकीमुळे सायकल मालक आणि पालक तक्रार करण्यासाठी सहसा पुढे येत नाहीत. त्यामुळे लातूर शहरात मोटारसायकलींबरोबर आता शाळकरी मुलांच्या सायकल चोरीचेही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी, एखाद्या पालकाची तक्रार आली तरी ती नोंदवून घेण्यापलिकडे पोलीस प्रशासन फारसे काही करीत नसल्याचा अनुभव पालकांना येतो. त्यामुळे तीन ते चार हजार रुपये किमतीच्या सायकलबाबत तक्रार करण्याच्या फंद्यात सहसा पालक पडत नाहीत. परिणामी, सायकल चोरणाऱ्या टोळीचे फावते. यातून सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)