अल्वपवयीन मुलाने घेतला तरुणाचा जीव
By Admin | Updated: July 4, 2016 21:31 IST2016-07-04T19:50:27+5:302016-07-04T21:31:40+5:30
विनापरवाना १६ वर्षीय मोटारसायकल चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी पिसादेवी रोडवर घडला.

अल्वपवयीन मुलाने घेतला तरुणाचा जीव
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ४ : विनापरवाना १६ वर्षीय मोटारसायकलचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी पिसादेवी रोडवर घडला.
नरेंद्रकुमार कामेश्वर सिंग (२६, मूळ,रा. बिहार, हल्ली मुक्काम पिसादेवी रोड) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी रोड परिसरात राहणारा नरेंद्रकुमार हा तरुण वडिलांना सिडको एन-७ येथील आंबेडकरनगर चौकात सोडून घरी दुचाकीने (क्रमांक एमएच-२० डीएन ९०७२) घरी परत जात होता. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने (क्रमांक एमएच-२० सीडी ८०२९) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात नरेंद्र्र हे गंभीर जखमी झाले. तेथून जाणारे मनोज आगळे यांनी तातडीने त्यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी नरेंद्र यास तपासून मृत घोषित केले. याविषयी पोलीस उपनिरीक्षक ए.के. मोरीन यांनी सांगितले की, नरेंद्र यांच्या दुचाकीला धडक देणारा दुसरा दुचाकीचालक हा १६ वर्षीय मुलगा आहे. तो पळशी तांडा येथे राहतो. तो भाजीमंडईत जात असताना नरेंद्र यांना जोरात धडकला. या मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. त्याच्याविरोधात नरेंद्रच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा सिडको ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताच्या मेहुण्याने पोलिसांत तक्रार नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नका- पोलीस निरीक्षक
आजकाल १५ ते १६ वर्षांची मुले, मुली दुचाकी चालविताना दिसतात. विनालायसन्स वाहन चालविणे आणि अल्पवयीन मुलांस वाहन चालविण्यास देणे गुन्हा आहे. विना लायसन्स असलेल्या व्यक्तीकडे वाहन देणे म्हणजे त्याच्या हातात शस्त्र देण्यासारखे असते. त्याच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे प्राण जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रथम वाहन चालविण्याचे लायसन्स काढावे आणि त्यानंतरच त्यांच्या ताब्यात वाहन द्यावे, असे आवाहन सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी केले आहे.