भूम कृउबाचे सचिव लाचप्रकरणी जेरबंद
By Admin | Updated: November 28, 2014 01:11 IST2014-11-28T00:19:52+5:302014-11-28T01:11:07+5:30
भूम : थकित पगार बील काढण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रविण मच्छिंद्र देवरे यांना रंगेहात जेरबंद करण्यात आले़

भूम कृउबाचे सचिव लाचप्रकरणी जेरबंद
भूम : थकित पगार बील काढण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रविण मच्छिंद्र देवरे यांना रंगेहात जेरबंद करण्यात आले़ लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली असून, या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे़
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १९९७ पासून रखवालदार म्हणून काम इसमास सन २००० पर्यंत वेळेवर पगार देण्यात आला़ त्यानंतर रखवालदारास आॅक्टोबर २००० ते आॅक्टोबर २००७ पर्यंत पगार न देता व्हाऊचर, चेक किंवा रोख रक्कम देण्यात आली़ या कालावधीत उपदान व अंशदान संयुक्त खात्यामध्ये रकमेचा भरणा केला नाही़ रखवालदाराने पगार मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ त्यानंतर रखवालदारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रविण देवरे यांना भेटून पगार काढण्याची मागणी केली़ त्यावेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून पगार काढून देतो, पण त्यासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा़ इतक्या दिवसांचा पगार काढायचा म्हणून तुम्ही २५ हजार रूपये द्या अशी मागणी करण्यात आली़ त्यानंतर रखवालदाराने १० हजार रूपये देवरे यांना दिले़
मात्र, देवरे यांनी उर्वरित १५ हजार रूपये दिल्याशिवाय थकीत पगार काढणार नाही, असे सांगितल्याची तक्रार रखवालदाराने उस्मानाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भूम येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात सापळा रचला़ देवरे यांनी रखवालदारास त्याच्या कामासाठी लाचेची मागणी करून १५ हजार रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ दरम्यान, सदरील प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास उपाधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (वार्ताहर)