घाटीत व्याख्यान कक्ष इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:27+5:302021-05-15T04:04:27+5:30
औरंगाबादः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) एमबीबीएसची विद्यार्थी संख्या गेल्या साठ वर्षांत हळूहळू वाढून २०० पर्यंत पोहोचली. मात्र, त्या क्षमतेचे ...

घाटीत व्याख्यान कक्ष इमारतीचे भूमिपूजन
औरंगाबादः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) एमबीबीएसची विद्यार्थी संख्या गेल्या साठ वर्षांत हळूहळू वाढून २०० पर्यंत पोहोचली. मात्र, त्या क्षमतेचे व्याख्यान कक्ष उपलब्ध नसल्याने, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचा पुढाकारातून घाटीत व्याख्यान कक्षांची ८.६७ कोटींची इमारत उभारण्यात येत आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर व्याख्यान कक्ष इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले.
एमबीबीएसच्या दोनशे जागांसाठी एमसीआयच्या निकषांच्या पूर्ततेसाठी आवश्यक चार व्याख्यान कक्षांची (लेक्चर थिएटर) स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी अंदाजपत्रक निर्मितीची प्रक्रिया फेब्रुवारी, २०१९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर, निधीसाठी पाठपुरावा सुरू झाला, तेव्हा जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने मदतीचा हात घाटीला दिला. गेल्या वर्षी ६ कोटींची मान्यता शासनाने दिली होती. अनेक तांत्रिक अडचणीत वर्ष सरले. अखेर दोन वर्षांनी इमारतीच्या बांधकामाला मुहूर्त लागला आहे. कोरोनामुळे काही निधीतही कपात झाली होती. मात्र, पुन्हा या निधीत वाढ होऊन आता ८.६७ कोटी रुपयांचा खर्च संस्थेकडून करुन ही इमारत उभारली जाणार आहे.
तळमजल्यासह तीन मजली सुसज्ज इमारतीसाठी महाविद्यालयासमोरची जागा निश्चित करण्यात आली. या थिएटरमध्ये पार्किंग, विद्यार्थ्यांसाठी कक्ष, कॅंटीन आणि तळमजल्याला पार्किंगचे नियोजन आहे. सोमवारपासून बांधकामाला सुरुवात होईल, असे उपाधिष्ठाता डाॅ.भारत सोनवणे यांनी सांगितले. उद्घाटनावेळी अधिष्ठाता डाॅ.कानन येळीकर, संस्थेचे सी.पी. त्रिपाठी, श्रीमती त्रिपाठी, शिरीष केंबवी, अनिल भंडारी, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ.एल. एस देशमुख, डाॅ.सरोजनी जाधव, डाॅ.अनिल जोशी, डाॅ.देशपांडे, डाॅ.प्रभा खैरे, डाॅ.अनिल वाघमारे आदींची उपस्थिती होती.