भोकरला पाच दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:27 IST2016-03-04T23:24:29+5:302016-03-04T23:27:00+5:30

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यासह भोकर शहरातही तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के तर धानोरा तलावात १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़

Bhokar gets water for five days | भोकरला पाच दिवसाआड पाणी

भोकरला पाच दिवसाआड पाणी

विठ्ठल फुलारी, भोकर
तालुक्यासह भोकर शहरातही तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के तर धानोरा तलावात १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ यामुळे शहरात आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून शहरातील जुने सर्वच बोअर सुरु करण्यात येणार आहेत़
तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे़ अनेक गावांतील अधिग्रहण केलेले बोअरही आता बंद पडत आहेत़ जनावरांचा पाणीप्रश्नही गंभीर झाला असून सहा तलाव कोरडे पडले आहेत़ ग्रामीण भागासह आता शहरातही पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा असून धानोरा तलावात केवळ १ टक्के साठा उपलब्ध आहे़
धानोरा तलाव लवकरच तळ गाठणार असल्याने भोकर शहराची सर्व भिस्त सुधा प्रकल्पावर राहणार आहे़ आजघडीला शहरात पाच दिवसआड पाणीपुरवठा होत असल्याने हे पाणी नागरिकांना अपुरे पडत आहे़ अनेक गरीब कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठवण करण्यासाठी सुविधा नसल्याने पाच दिवसाआड येणारे पाणी दोन दिवसांत संपत असून नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
या पाणीपुरवठा योजनेला शहरातील ६० बोअरला आधार देवून नगर परिषद पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शहरात ग्रामपंचायत काळातील व त्यानंतर घेतलेले २०० बोअर आहेत़ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने हे बोअर बंद करण्यात आले होते़ पण सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता पुन्हा हे सर्वच बोअर चालू करण्यात येणार आहेत़; पण पाणीपातळी घटत चालल्याने यातील किती बोअर चालतील हे पहावे लागणार आहे़
पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्च व आता नव्याने बोअरवर आगाऊ खर्च नगर परिषदेला सहन करावा लागणार आहे़ विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश बोअरच्या पाण्यात फ्लोरासीसचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी पिण्यास कितपत योग्य आहे? असाही प्रश्न उपस्थित होत असून शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे़

Web Title: Bhokar gets water for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.