मानसिक संतुलन बिघडले धसांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:52 IST2017-09-22T00:52:38+5:302017-09-22T00:52:38+5:30
निवडणुकांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. त्यामुळेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे वायफळ बोलत आहेत, असा आरोप आ.भीमराव धोंडे यांनी केला.

मानसिक संतुलन बिघडले धसांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. त्यामुळेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे वायफळ बोलत आहेत, असा आरोप आ.भीमराव धोंडे यांनी केला. सुरेश धस यांनी ‘धोंडेनी मतदारसंघाची वाट लावली, त्यांचा तीन वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ हा निष्क्रिय आहे’ असा आरोप बुधवारी केला होता, याला प्रत्यूतर देण्यासाठी आ.धोंडेनी पत्रपरिषद घेऊन धसांवर हल्लाबोल चढविला.
आ.धोंडे पुढे म्हणाले, मागील १५ वर्षांत सुरेश धस यांनी सत्तेच्या काळात मतदार संघात काय काम केले आहे, ते मतदारांना सांगावे. किंबहुना त्यांनी पंधरा वर्षात एखाद्या रस्त्याचे १० कि.मी.डांबरीकरण केलेले दाखवून द्यावे. त्यांनी फक्त त्यांच्या काळात गावा-गावात, घरा-घरात, भावा-भावात वाद लावून आपले राजकारण केले. हीच सुरेश धस यांची खेळी मतदार संघातील जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने धसांना त्यांची जागा दाखवून दिली, असा आरोप धोंडेंनी केला. लोकसभा, विधानसभासह जि.प. निवडणुकीत यश न मिळाल्यानेच धसांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे वायफळ बडबड करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तीन वर्षात आष्टी मतदार संघात किमान एक हजार कोटी रुपयांची रस्ता कामे मंजूर केले. काही कामे पुर्णही केले आहेत. त्यामुळे कुणी मतदार संघाची वाट लावली आहे, हे मतदारांना माहिती आहे. त्यांनी पेपरबाजी करून सांगायची गरज नाही, असेही आ.धोंडे यांनी सांगितले.