भाग्यश्रीचे पतीसोबत गोडीगुलाबीचे ढोंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:55 IST2017-09-12T00:55:16+5:302017-09-12T00:55:16+5:30
भाग्यश्री होळकरने पतीच्या हत्येची तीन महिन्यांपूर्वीच सुपारी दिली होती. परंतु तेव्हापासून तिने आपल्या वर्तनात जबरदस्त बदलाचे ढोंग रचले. पती- पत्नीतील संबंध स्नेहाचे असल्याचे नातेवाईकांना भासविण्यासाठी ती पतीसोबत अत्यंत गोडीगुलाबीने वागू लागली.

भाग्यश्रीचे पतीसोबत गोडीगुलाबीचे ढोंग
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भाग्यश्री होळकरने पतीच्या हत्येची तीन महिन्यांपूर्वीच सुपारी दिली होती. परंतु तेव्हापासून तिने आपल्या वर्तनात जबरदस्त बदलाचे ढोंग रचले. पती- पत्नीतील संबंध स्नेहाचे असल्याचे नातेवाईकांना भासविण्यासाठी ती पतीसोबत अत्यंत गोडीगुलाबीने वागू लागली. प्रत्येक कार्यक्रमालाही पतीसोबत आवर्जून जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांची छत्रपतीनगरातील राहत्या घरी शुक्रवारी रात्री गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृताची पत्नी भाग्यश्री हिच्यासह चौघांना अटक केली. भाग्यश्रीने सुपारी देऊन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. भाग्यश्रीने अत्यंत शांत डोक्याने कट रचून जितेंद्रची हत्या केल्याचे समोर आल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वर्ग दोन पदी कार्यरत असलेल्या भाग्यश्रीचे पतीसोबत पटत नव्हते. चारित्र्यावर संशय घेऊन जितेंद्र भाग्यश्रीला त्रास देई. यावरून पती-पत्नीत सतत भांडणे होत. ही बाब नातेवाईकांनाही माहीत होती. या त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी जितेंद्रला संपविण्याचा निर्णय तिने घेतला. किरण गणोरेच्या मदतीने तीन महिन्यांपूर्वी हत्येचा कट रचला. पती-पत्नीतील वादाची किनार हत्येला लागू नये, यासाठी तिने मनोमिलनाचे नाटक वठविणे सुरू केले. पतीसोबत गोडीगुलाबीने ती राहू लागली. कटाचाच भाग म्हणून ती जितेंद्रचे बोलणे ऐकून घेऊन त्याला उलट उत्तरे देणे तिने थांबविले. तो म्हणेल तसे ती वागू लागली