भाग्यश्री-विशालचा जुळला पुन्हा संसार..!
By Admin | Updated: December 9, 2015 00:41 IST2015-12-09T00:25:11+5:302015-12-09T00:41:19+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर किरकोळ कारणांवरुन भाग्यश्री व विशालचा संसार विस्कटला होता़ भांडण टोकाला गेले़ ही विस्कटलेली घडी निलंगा पोलिसांच्या मदतीने बसली असून, आता या दोघांचा संसार रुळावर आला आहे़

भाग्यश्री-विशालचा जुळला पुन्हा संसार..!
राजकुमार जोंधळे , लातूर
किरकोळ कारणांवरुन भाग्यश्री व विशालचा संसार विस्कटला होता़ भांडण टोकाला गेले़ ही विस्कटलेली घडी निलंगा पोलिसांच्या मदतीने बसली असून, आता या दोघांचा संसार रुळावर आला आहे़
निलंगा शहरातील साठे नगरातील भाग्यश्री सुनील थोरात यांचा विवाह मुंबई येथील विशाल बाबुराव कांबळे यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे २०१३ मध्ये झाला. लग्नानंतर भाग्यश्री आणि विशालचा संसार सुरळीत सुरु होता. काही शुल्लक कारणामुळे त्यांच्यात गैरसमज वाढत गेले. याच गैरसमजाचा कुटुंबातील इतर मंडळींनी फायदा घेत प्रकरण प्रतिष्ठेचे बनविले. त्यातून त्यांनी कांही पैशामध्ये तडजोड करत घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भाग्यश्रीला विशालसोबतच संसार करायचा होता. घरातील कांही मंडळींमुळे हे शक्य होत नव्हते. या दोन कुटुंबातील वाद खूपच विकोपाला गेला. शेवटी भाग्यश्री ही आपल्या आई-वडिलांकडे निलंग्यातच राहू लागली. यादरम्यान तिने आपल्याला सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार निलंगा पोलिस ठाण्यात सप्टेंबरमध्ये दाखल केली. यानंतर लातूरच्या महिला तक्रार निवारण केंद्रात विशाल आणि भाग्यश्रीचे समुपदेशन झाले. मात्र विशाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा घटस्फोटासाठी आग्रह होता. दरम्यान निलंगा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक प्रियंका अगाव यांनी हे प्रकरण आपल्या हाती घेतले. त्यांनी मुंबईतील विशाल कांबळे यांचे घर गाठले. त्यांनी या कुटुंबाला निलंग्यात बोलावून घेत सोमवारी दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन केले. केवळ शुल्लक कारणांमुळे संसार कसा मोडतो हेच पोलिसांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. शेवटी भाग्यश्री आणि विशाल यांच्यात निलंगा पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तडजोड झाली आणि तुटणारा संसार पुन्हा जुळला. पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा नव्याने संसार थाटण्याचे वचन या दोघांनी एकमेकांना दिले़