उदंड जाहले संशोधक!
By Admin | Updated: November 19, 2014 01:01 IST2014-11-19T00:47:48+5:302014-11-19T01:01:39+5:30
विजय सरवदे , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी चांगली भूमिका घेतली असली

उदंड जाहले संशोधक!
विजय सरवदे , औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी चांगली भूमिका घेतली असली तरी दुसरीकडे मात्र संशोधक विद्यार्थ्यांच्या तुलनेत गाईडची मोठी वानवा आहे. विद्यापीठात सध्या नव्या नियमानुसार ७५९ गाईड असून ‘पेट-३’ उत्तीर्णांची संख्या ३ हजार ४६७ एवढी आहे. शिवाय संशोधनासाठी दावा करणाऱ्या नेट, सेट, एम.फिल., कार्यरत प्राध्यापक आदींची संख्या वेगळीच आहे.
विद्यापीठात संशोधनासाठी गाईड मिळत नसल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. मध्यंतरी गाईडची संख्या वाढविण्यासाठी प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही नियम व अटी शिथिल केल्या होत्या. त्यानुसार आता गाईडची संख्या ५०० वरून वाढून आता ७५९ पर्यंत आली आहे. दुसरीकडे पेट-१, पेट-२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संशोधनासाठी गाईड मिळाले नसल्यामुळे ते विद्यापीठात खेटे घालत आहेत. आता पेट-३ झाली. यामध्ये ३ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय संशोधनास पात्र असलेले नेट, सेट, एम.फिल., कार्यरत प्राध्यापकांना संशोधनाची संधी कधी मिळणार, असा मोठा पेच विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यापीठाबाहेरील राज्य तसेच देशभरातील विद्यापीठे, मोठमोठे उद्योग व संस्थांमधील तज्ज्ञांना गाईडशिप देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे; पण अद्याप कोणाकडून तसा होकार मिळालेला नाही.
एकीकडे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा रेटा वाढत आहे, तर दुसरीकडे तुलनेने गाईडची संख्या अपुरी पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने आरक्षण, कोटा पद्धत अवलंबली असून त्याद्वारेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आता नव्याने आणखी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १५० महाविद्यालयीन प्राध्यापकांनी गाईडसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. ते ‘आरआरसी’पुढे जातील. छाननीमध्ये पात्र ठरल्यास मान्यतेसाठी पुढे ते बोर्ड आॅफ युनिव्हर्सिटी टीचर्स रिसर्च कमिटी (बीयूटीआरसी) ठेवले जाणार आहेत. ‘बीयूटीआरसी’ची मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठात ९०९ गाईड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.