छत्रपती संभाजीनगर : मागे चारही कार्यकर्ते नसतात, पण असे कार्यकर्ते तिकिटाची अपेक्षा बाळगून असतात. अशा कार्यकर्त्यांपासून सावध राहण्यासाठी पक्षाने प्रत्येक वाॅर्डात निरीक्षक पाठवून नीट माहिती घ्यावी आणि मगच तिकिटे अंतिम करावीत, असे अनुभवाचे बोल काँग्रेसच्या आढावा बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना ऐकवले.
जालना रोडवरील एका लॉन्समध्ये सकाळी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यापासून ही बैठक सुरू झाली. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी आपला अहवाल मांडला. बहुतांश कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका लढवाव्यात, असे वाटत होते. काहींनी स्वबळाचा नारा दिला. किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र रमंडवाल यांनी निरीक्षकाकरवी तटस्थपणे अहवाल मागवून जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांना तिकिटे देण्याची सूचना केली.
अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, गंगापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड, सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, कन्नड तालुकाध्यक्ष संजय जाधव, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोईन इनामदार, छावणी ब्लॉक अध्यक्ष उमाकांत खोतकर, गुलमंडी ब्लॉक अध्यक्ष किशोर तुळशीबागवाले, महिला प्रतिनिधी दीपाली मिसाळ, जिल्हा महिलाध्यक्षा दीक्षा पवार, आदींनी आपापली मते मांडली. सायंकाळपर्यंत आढावा बैठक सुरू होती. नंतर सपकाळ यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालय, गांधी भवन, शहागंज येथे भेट दिली.
आढावा बैठकीस छत्रपती संभाजीनगरात राहणारे सर्व प्रदेशचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. विश्वजित कदम हे उशिरा पोहोचले, तर सतेज पाटील आढावा बैठकीसाठी आलेच नाहीत. जे पदाधिकारी अनुपस्थित राहिले, त्यांना नोटिसा बजावून कारणे विचारली जातील, असे सपकाळ म्हणाले.