पावणेतीन लाख प्रवाशांना लाभ
By Admin | Updated: June 19, 2014 00:19 IST2014-06-18T23:56:01+5:302014-06-19T00:19:25+5:30
कंधार : राज्य परिवहन महामंडळामार्फत विविध सवलत योजना दिली जाते़ त्या योजनेचा फायदा प्रवाशांना मिळतो़ त्यात कंधार आगारातील बसेसचा २ लाख ८३ हजार ६६३ जणांनी लाभ घेतला़
पावणेतीन लाख प्रवाशांना लाभ
कंधार : राज्य परिवहन महामंडळामार्फत विविध सवलत योजना दिली जाते़ त्या योजनेचा फायदा प्रवाशांना मिळतो़ त्यात कंधार आगारातील बसेसचा २ लाख ८३ हजार ६६३ जणांनी लाभ घेतला़ यात सर्वाधिक २ लाख ५८ हजार ९५८ जण ज्येष्ठ नागरिक असल्याचे मागील महिन्याचे चित्र समोर आले आहे़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते़ प्रवाशांना नियमित, निश्चित, सुरक्षित, आरामदायी सेवा देणारी लोकवाहिनी म्हणून महामंडळाने आपला विश्वास प्रवाशांवर उमटविला आहे़ प्रवाशांना विशेष सवलती देऊन समाजाप्रती, समाजातील विविध घटकांना सवलतीतून आपल्याकडे आकर्षित करण्यात हात आखडता घेतला नाही़ कंधार आगारातील ६६ बसेसनी जिल्ह्यासह राज्यात धावून आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे़ नागपूर, आळंदी, औरंगाबाद, पंढरपूर, अमरावती, शेगाव, अक्कलकोट, रिसोड, लातूर शहरासाठी लांब पल्ल्याच्या बससेवा दिल्या़ सर्वाधिक बस कंधार-नांदेड मार्गावर धावतात़ ग्रामीण भागातही नागरिकांना बराचसा आधार आहे़ वाडी-तांडे, गावात मोठा शिरकाव बसचा झाला आहे़
सवलत योजनेतून मे महिन्यात ८९ लाख ४६ हजार ४०३ रुपये एकूण उत्पन्न झाले़ प्रत्यक्ष आगाराला मात्र ४१ लाख ३७ हजार ६५६ मिळाले आणि शासनाकडून ४८ लाख ८ हजार ७४७ रुपये येणे बाकी असल्याचे आगारातून सांगण्यात आले़ सवलत योजनेतून त्रैमासिक पासचा १३ जणांनी लाभ घेतला़ मासिक पास १९, शालेय विद्यार्थी २७५ व महाविद्यालयीन विद्यार्थी ११३, सुटीत जाणे-येणे २४, आजारी आई-वडिलांना भेटणे ४६, विविध शिबीर १६, कर्करोगी ३, अंधव्यक्ती २ हजार ७३६, स्वातंत्र्य सैनिक ९०, अंध व्यक्तीसोबत-२३, अधिस्वीकृती पत्रकार ४ आणि ज्येष्ठ नागरिक २ लाख ५८ हजार ९५८ जणांनी लाभ घेतला़
आवडेल तेथे प्रवास, मासिक पास, त्रैमासिक, वार्षिक सवलत कार्ड आदी सवलत योजना असून १०० टक्के सवलत योजनेत विद्यमान आमदार व माजी आमदार आणि त्यांचे साथीदार, स्वातंत्र्य सैनिक व एक साथीदार, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती व एक साथीदार, आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्ती व एक साथीदार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी व एक साथीदार, अपंग गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त व्यक्ती व एक साथीदार या वरील सर्वांना साथीदारासहीत वर्षभर मोफत प्रवास सवलत आहे़
अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू यांना वार्षिक ५०० मूल्यांपर्यंत, पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान मिळालेल्या एका वारकरी दांपत्यास एका वर्षासाठी ९ हजार इतक्या मूल्याइतकी मोफत प्रवास सवलत दिली आहे़ अंध व अपंग व्यक्ती आणि कुष्ठरोगी वैद्यकीय उपचारासाठी ७५ टक्के सवलत, विद्यार्थी मासिक पास, वर्षातून एक सहल, व मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थी सहलीसाठी ६६़६७ टक्के सवलत आहे़
तसेच ५० टक्के सवलत योजनेत विद्यार्थ्यांना नैमित्तिक करार, विद्यार्थ्यांना मूळ गावी जाणे-येणे, परीक्षेला जाणे, शैक्षणिक शिबीर, अपंग व अंध व्यक्तीसह मदतनीस, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, क्षयरोगी व कर्करोगी उपचारासाठी आहे़ राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळात भाग घेवून विजेत्या स्पर्धकांसाठी ३३़३३ टक्के सवलत आहे, अशी माहिती आगारप्रमुख के़ व्ही़ कऱ्हाळे यांनी दिली़ (वार्ताहर)
मे २०१३ मध्ये ६ लाख ६३ हजार १३६ कि़मी़ बसेस धावली होती़ त्यातून १ कोटी ७२ लाख २४ हजार ६०२ रुपये उत्पन्न झाले़ २०१४ मधील मे महिन्यात ७ लाख २२ हजार १२३ कि़मी़चा प्रवास झाला़ त्यातून १ कोटी ९८ लाख ३६ हजार ८०८ रुपये उत्पन्न झाले़ मागील वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात जवळपास २६ लाखांनी उत्पन्न वाढले़ त्यात सवलत योजनेचेही भरीव योगदान आहे़