‘समाजकल्याण’मधून लाभार्थ्यांच्या याद्या गहाळ

By Admin | Updated: November 5, 2014 00:59 IST2014-11-05T00:43:19+5:302014-11-05T00:59:30+5:30

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयातून वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या बेपत्ता झाल्या आहेत.

Beneficiary lists missing from 'Social Welfare' | ‘समाजकल्याण’मधून लाभार्थ्यांच्या याद्या गहाळ

‘समाजकल्याण’मधून लाभार्थ्यांच्या याद्या गहाळ



औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयातून वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या बेपत्ता झाल्या आहेत. सभापती व अधिकाऱ्यांच्या पाठशिवणीच्या खेळात तब्बल दोन वर्षांपासून या योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांचा पुरता कोंडमारा जिल्हा परिषदेने केला आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये निधी दोन वर्षांपासून अखर्चित राहिला आहे. हा निधी अखर्चित राहण्याची कारणे ना जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांनी विचारली ना प्रशासनाला त्यात स्वारस्य दिसले; परंतु यात मागासवर्गीय लाभार्थ्यांना मात्र आर्थिक भुर्दंड बसला. या लाभार्थ्यांना मोठ्या मनस्तापालाही सामोरे जावे लागले असतानाच अपंगासाठीच्या झेरॉक्स मशीन या वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांची तयार झालेली एक यादीही गायब झाल्याचे नूतन सभापती शीला चव्हाण यांनी सांगितले आहे.
याद्यांचा घोळात घोळ
सभापतीपदावरून नुकतेच पायउतार झालेले रामनाथ चोरमले यांना अडीच वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजना मार्गी लावण्यात यश आले नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, त्यांच्याच पक्षाचे गट नेते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि समाजकल्याण समितीच्या सदस्यांशीही चोरमले यांचे फारसे सख्य जमल्याचे कधीच दिसले नाही. आपल्याच मर्जीतले लाभार्थी असावेत, यासाठी त्यांच्यात सतत तनातणी झाली. जाता- जाता चोरमले यांनी झेरॉक्स मशीन योजनेची यादी तयार केली; परंतु त्यावर समाजकल्याण अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्याच केल्या नाहीत. त्यामुळे वाटप रखडले. आता नूतन सभापती चव्हाण यांनी पदभार हाती घेतल्यानंतर ही यादी गहाळ झाल्याचा आरोप केला आहे. पुन्हा एकदा सदस्यांकडून नावे मागविण्याचा पर्याय सुचविला आहे.
लाभार्थी जिल्हा परिषदेत
गेल्या दोन वर्षांतील सर्वच योजनेतील लाभार्थ्यांशी ‘संपर्क’ साधून चोरमले यांनी प्रस्ताव मागविले होते. प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीपर्यंत या लाभार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागले. विशेषत: दलित सुधार योजनेत कामे घेण्यासाठी सरपंचांची चढाओढ लागली होती. त्यातील निवडक ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर झाले. साधारणत: ७ कोटी रुपयांचे नियोजन झाल्याचे सभापती चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
हे लाभार्थी आता दररोज जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत. यातील अनेक प्रस्ताव योजनेच्या अटी व शर्थींचे उल्लंघन करून मंजूर झाल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
अपंगासाठीच्या झेरॉक्स योजनेतील ५५ लाभार्थ्यांची यादी मी दि.६ सप्टेंबर रोजी तयार करून तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे दिली होती. ती गहाळ होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या माहितीनुसार ही यादी नवीन सभापतीकडेच आहे. यादी बदलण्यासाठीचा सोपा मार्ग म्हणून त्यांनी यादीच गहाळ झाल्याचा आरोप केला असावा.
-रामनाथ चोरमले, माजी सभापती,
समाजकल्याण समिती
मागासवर्गीयांच्या योजना राबविण्यात कसूर करण्यास जबाबदार कोण, ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. प्रशासनाने यात काहीही रोखठोक भूमिका घेतली नसल्याने संशय अधिकच बळावतो आहे.

Web Title: Beneficiary lists missing from 'Social Welfare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.