सुकन्या योजनेतील लाभार्थ्यांच्या गणनेस प्रारंभ
By Admin | Updated: August 29, 2014 01:26 IST2014-08-29T00:34:00+5:302014-08-29T01:26:17+5:30
हिंगोली : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी सुकन्या योजना अंमलबजावणीच्या टप्प्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोषणा झालेल्या योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी गणना आता सुरू झाली

सुकन्या योजनेतील लाभार्थ्यांच्या गणनेस प्रारंभ
हिंगोली : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी सुकन्या योजना अंमलबजावणीच्या टप्प्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोषणा झालेल्या योजनेतील प्रत्यक्ष लाभार्थी गणना आता सुरू झाली असून विभागीय आयुक्तालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे.
या योजनेच्या घोषणेनंतर जन्मलेल्या व शासन निर्णयातील निकषात बसणाऱ्या मुलीच्या नावावर शासन एका वर्षाच्या आत २१ हजार रुपये गुंतवणार आहे. तर त्या मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबातील दोन मुलींना याचा लाभ मिळणार आहे. तसेच बालगृहातील 0 ते ६ वयोगटातील अनाथ मुली तसेच सहा वर्षांच्या आतील अनाथ मुलीस दत्तक घेणाऱ्या पालकांना याचा लाभ मिळणार आहे.
अशा मुलींच्या कमावत्या पालकांचा अपघात विमा उतरविण्याचीही या योजनेत तरतूद आहे. तसेच पहिली ते बारावीपर्यंतच्या मोफत शिक्षणाबरोबर या मुलींना नववी ते बारावीपर्यंत शिक्षा सहयोग शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाकडून १ जानेवारी ते ३१ मार्च २0१४ या कालावधीत जन्मलेल्या मुलींची नावे मागविली आहेत. यासाठी एकूण २६ रकान्यातील माहिती भरून पाठविण्यासाठी प्रपत्र जिल्हा परिषदांना दिले आहे. त्यानुसार संबंधितांची व त्या कुटुंबाची माहिती शासनाला मिळणार आहे. ही माहिती तालुका स्तरावरून मागविण्यात आली असून ती आल्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे. मात्र या योजनेतील निधीबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)