समाधान मेळाव्यात लाभार्थ्यांची रीघ
By Admin | Updated: August 15, 2014 00:03 IST2014-08-14T23:28:52+5:302014-08-15T00:03:24+5:30
सेलू : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ, विशेष सहाय्यता निधीसाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात दाखल केलेले प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे शेकडो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़

समाधान मेळाव्यात लाभार्थ्यांची रीघ
सेलू : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ, विशेष सहाय्यता निधीसाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात दाखल केलेले प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे शेकडो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून चार दिवसांत प्रकरणे निकाली काढा, अशी तंबी दिली़
महसूल विभागाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियाना अंतर्गत न.प.च्या श्री साईनाट्य मंदिरात समाधान शिबिराचे आयोजन १४ आॅगस्ट रोजी केले होते़ अध्यक्षस्थानी आ़ रामप्रसाद बोर्डीकर होते़ उपविभागीय अधिकारी पी़ एस़ बोरगावकर, तहसीलदार आसाराम छडीदार, तालुका कृषीे अधिकारी राम रोडगे, नगराध्यक्ष सुरेश कोरडे, हेमंतराव आडळकर, पवन आडळकर, नामदेव डख, सदाशिव निकम, विलास रोडगे, आसाराम कटारे, आदींची उपस्थिती होती़
तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ तसेच दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंब प्रमुखांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना देण्यात येणारे विशेष सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल केले़ परंतू, संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याने हे प्रस्ताव गहाळ केले़ त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नवा पेच प्रशासना पुढे उभा राहिला आहे़
समाधान मेळाव्यात या योजनेच्या लाभार्थी वृद्ध महिलांनी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्यापुढे हा प्रश्न उपस्थित करून अनुदानाची मागणी केली़ प्रस्ताव सापडण्याचे काम लाभार्थ्यांनाच करावे लागत आहे़ एका शिपायालाच या विभागाचा कारभार देण्यात आला होता़ त्यामुळे संतप्त झालेल्या आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना खडसावून चार दिवसात पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करा, अशी सूचना केली़ यावेळी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र व विशेष सहाय्यता निधी तसेच निराधार पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले़ शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु शेवटच्या घटकापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करणे आवश्यक आहे़ पंचायत समितीच्या योजना राबविताना सत्ताधारी राजकारण करत आहेत़ त्यामुळे अनेक कामे विलंबाने होत असल्याची टीका आ़ बोर्डीकर यांनी केली़ यावेळी कृषी विभागाच्या योजनांची माहिती कृषी अधिकारी राम रोडगे यांनी दिली़ प्रास्ताविक नायब तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद आष्टीकर तर मंडळ अधिकारी संजय काकडे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)