पं.स.कार्यालयात लाभार्थ्यांच्या चकरा

By Admin | Updated: June 26, 2014 00:41 IST2014-06-26T00:33:33+5:302014-06-26T00:41:26+5:30

कळमनुरी : इंदिरा आवास घरकूल योजनेचे अंतीम टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत.

Beneficiaries of panchayat office | पं.स.कार्यालयात लाभार्थ्यांच्या चकरा

पं.स.कार्यालयात लाभार्थ्यांच्या चकरा

कळमनुरी : इंदिरा आवास घरकूल योजनेचे अंतीम टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत.
घरकुलांचे काम पूर्ण होऊनही अंतीम टप्प्याचे अनुदान मिळत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी २४ जून रोजी पंचायत समिती गाठली. पं. स. कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले. गटविकास अधिकारी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पी.आर. उबारे हे उपस्थित नसल्याने त्यांनी अनुदान तत्काळ मिळण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.
तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील ६५, जटाळवाडी येथील ५२ तर मोरवड येथील १५ लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या शेवटच्या टप्प्याचे अनुदान मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. जवळपास तीन महिन्याच्या कालावधीपासून हे अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून, घरकुलावर टाकण्यासाठी काहीही नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहे. दररोज चकरा मारूनही अंतिम अनुदान मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. या लाभार्र्थ्यांना दोन टप्प्याचे म्हणजे ७० हजार रुपयांचे अनुदान मिळाले व तिसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळाले नाही. अनुदान मिळावे, यासाठी आदिवासी युवक कल्याण महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अनुदान आठ दिवसात न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर डॉ. सतीश पाचपुते, शिवप्रसाद पाचपुते, चंद्रकला काळे, तुळशीराम डाखुरे, सुभाष नाईक, हनवतराव ढाकरे, नारायण भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
तीन महिन्यांपासून लाभार्थी त्रस्त कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील ६५, जटाळवाडी येथील ५२ व मोरवड येथील १५ लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत शेवटच्या टप्प्याचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार.
सध्या पावसाळा सुरू असल्याने घरावर टाकण्यासाठी पत्रे नसल्याने ग्रामस्थ सापडले अडचणीत.
आदिवासी युवक कल्याण महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन लाभार्थ्यांना अनुदान देण्याची करण्यात आली मागणी.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा.

Web Title: Beneficiaries of panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.