भाग्यश्री योजनेला लाभार्थीच मिळेनात
By Admin | Updated: November 2, 2016 01:04 IST2016-11-02T01:03:00+5:302016-11-02T01:04:55+5:30
बीड : स्त्री भ्रूण हत्येमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती.

भाग्यश्री योजनेला लाभार्थीच मिळेनात
बीड : स्त्री भ्रूण हत्येमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. बीड पाठोपाठ इतर ठिकाणीही चार वर्षांपूर्वी स्त्री भ्रूण हत्येचे गैरप्रकार समोर आले होते. त्यानंतर स्त्री जन्माचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू झाल्या. यापैकीच ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्वाची योजना. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वर्षभरात केवळ १६ जणांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचला आहे.
१ एप्रिल २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही अनोखी योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत एकुलती एक मुलगी असलेल्या व मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास तिचा जन्म दिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये व मुलींच्या नावे २१ हजार २०० रुपयांचा विमा काढला जातो. तसेच एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दुसऱ्या मुलीचा जन्म दिन साजरा करण्यासाठी अडीच हजार रुपये व दोन्ही मुलींच्या नावे २१ हजार २०० रुपयांचा विमा काढण्यात येतो. पहिल्या वर्षांपासून १८ वर्षांपर्यंत दर्जेदार पोषण आहार व इतर खर्चांसाठी या योजनेंतर्गत लाभ देण्याची तरतूद आहे. कन्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण तरतुदी असलेली ही योजना आतापर्यंत केवळ १६ जणांपर्यंत पोहचली. आष्टी, बीड, केज येथे प्रत्येकी १, परळीत २, अंबाजोगाईत ६ व वडवणीत ५ जणांनी लाभ घेतला. गेवराई, धारुर, शिरुर, पाटोदा, माजलगाव या तालुक्यांमध्ये अद्याप एकही लाभार्थी या योजनेत सहभागी झाला नाही.(प्रतिनिधी)