लाभार्थी आमच्या गावातील नाहीत !
By Admin | Updated: May 12, 2015 00:51 IST2015-05-12T00:16:48+5:302015-05-12T00:51:34+5:30
लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आले असून

लाभार्थी आमच्या गावातील नाहीत !
लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आले असून, अनेक लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या जाती दाखविल्या आहेत़ लाभार्थ्यांचे पत्तेही चुकीचे आहेत़ दरम्यान, औसा तालुक्यातील लोदगा गावाचा पत्ता दर्शविण्यात आलेले तीन लाभार्थी आमच्या गावातील नसल्याचे ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे कळविले आहे़ त्यामुळे महामंडळाच्या कर्ज वितरणात काहीतरी घोळ असल्याचा संशय बळावला आहे़
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयाच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिले आहे़ शिवाय, १५ ते २५ कर्जप्रकरणात एकाच लाभार्थ्याच्या वेगवेगळ्या जाती दर्शविल्या आहेत़ दरम्यान या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त मालिका प्रकाशित होताच काळे गल्ली येथील वसंत लिंबाजी घोडके यांनी माहितीच्या अधिकारात औसा तालुक्यातील लोदगा ग्रामपंचायतीकडे २५१ कर्जप्रकरणातील लोदग्याचा पत्ता दर्शविलेल्या ६ लाभार्थ्यांच्या गावाबाबत व जातीबाबत माहिती मागितली़ त्यानुसार लोदगा ग्रामपंचायतीने माहिती दिली असून, नरसिंग लक्ष्मण गायकवाड, श्रीपती माणिक जाधव, विनोद पोपटसिंग कतारी हे लोदगा येथील रहिवाशी नसल्याचे पत्र दिले आहे़ संजय बजरंग सुरवसे हे लाभार्थी मात्र आमच्या गावातील असून, ते भोई समाजाचे नसून वडार समाजाचे आहेत़
शिवाय, अशोक माधवराव जाधव हे भोई समाजाचे नसून कोल्हाटी समाजाचे तर प्रल्हाद बजरंग सूरवसे हे भोई समाजाचे नसून वडार समाजाचे असल्याचे पत्र लोदगा ग्रामपंचायतीने वसंत घोडके यांना दिले आहे़ प्रस्तुत लाभार्थ्यांची नावे २५१ कर्जप्रकरणात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जून भाईकट्टी यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे़ (प्रतिनिधी)