जिल्हाधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस
By Admin | Updated: March 31, 2016 00:26 IST2016-03-31T00:21:35+5:302016-03-31T00:26:51+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे व न्या. के.एल. वडणे यांनी नोटीस बजावली.

जिल्हाधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस
उस्मानाबाद : उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे व न्या. के.एल. वडणे यांनी नोटीस बजावली. याचिकेची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार असे पथक ५ फेब्रुवारी २०१६ रोजी चारा छावण्या तपासण्यासाठी गेले होते. या पथकाने संत भगवानबाबा बहुउद्देशीय ग्रामीण संस्थेच्या धोंडराई (ता. भूम) येथील चारा छावणीला भेट दिली. त्यानंतर पथक परत जात असताना, ईट (ता. भूम) येथे पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली, जोरदार घोषणाबाजी देऊन गाडीच्या काचांवर थापा मारल्या, तसेच गोंधळ घातला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मंडळ निरीक्षकांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात लोकांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याचा तपास सुरुवातीला पोनि शेख यांच्याकडे होता. नंतर तो निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याकडे देण्यात आला. ठोंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा जबाब घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अनेक चकरा मारल्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी जबाब दिला नाही. त्यामुळे ठोंबरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६० नुसार जिल्हाधिकाऱ्यांना समन्स काढले.
यावर नारनवरे यांनी मलाही कोर्टाचे अधिकार आहेत, असे म्हणत न्यायालयाच्या अवमान कायद्याच्या कलम १७ प्रमाणे ठोंबरे यांना नोटीस काढून हजर राहण्याचे आदेश दिले. म्हणून ठोंबरे यांनी खंडपीठात आव्हान दिले. अवमान याचिकेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार स्वत:कडे घेऊन कार्यवाही केली. उच्च पदावर असताना कायद्याची मदत न करता कायद्याचा दुरुपयोग केला, अशा त्यांच्या तक्रारीवरून ठोंबरे यांची बदली करण्यात आली असल्याचे मुद्दे याचिकेत नमूद केले. सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देऊन नोटीस बजाविण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. व्ही.डी. सपकाळ, अॅड. आदिनाथ जगताप व अॅड. विजय जगताप तर शासनातर्फे किशोर होके पाटील काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)