बदनामीच्या भीतीने खुनाचा बनाव!
By Admin | Updated: October 2, 2014 00:51 IST2014-10-02T00:49:43+5:302014-10-02T00:51:06+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचे रहस्य उलगडले आहे.

बदनामीच्या भीतीने खुनाचा बनाव!
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचे रहस्य उलगडले आहे. तिचा पतीने खून केलेला नाही, तर अनैतिक संबंधातून तिने पतीच्या चुलत भावाबरोबरच पलायन केले आहे. ती पळून गेल्याने आता आपली बदनामी होईल, या भीतीपोटी अन् बदनामी टाळण्यासाठी पतीने ‘मी पत्नीचा खून केला’ असा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
२८ सप्टेंबर रोजी महानंदा पुंडलिक गुंजुटे (२२, रा.दत्तनगर, रांजणगाव शेणपुंजी) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज ठाण्यात दिली होती. तक्रार दिल्यानंतर पुंडलिक ३० सप्टेंबरला आपल्या मूळ गावी चाकूरला गेला होता. त्याने सासऱ्याला महानंदा गायब झाल्याची माहिती दिली. संतप्त सासऱ्याने त्यास जबर मारहाण केली. बदनामी होऊ नये, यासाठी त्याने नातेवाईकांना आपण महानंदाचा खून करून प्रेत रांजणगाव शेणपुंजी येथे नालीत टाकल्याची थाप मारली. महानंदाचा खून झाल्याचे समजताच नातेवाईकांनी त्यास चाकूर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांनी माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना देऊन पुंडलिकने प्रेत नालीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र मृतदेह सापडला नाही.
बदनामी व महानंदाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे पुंडलिकने पत्नीचा तान्हाजीच्या मदतीने खून केल्याची थाप मारली होती. सध्या निवडणूक रणधुमाळीत पोलीस प्रशासन व्यस्त असून, पुंडलिकच्या थापेमुळे दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांची न झालेल्या खुनाचा शोध लावण्यासाठी चांगलीच दमछाक झाली. सध्या तान्हाजीचे मोबाईल लोकेशन हैदराबाद येथे मिळत असल्यामुळे महानंदा व तान्हाजी हे दोघेही सोबत असल्याचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले. हैदराबादला पथक पाठवून या दोघांना ताब्यात घेतले जाईल.