कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात
By Admin | Updated: July 10, 2016 01:08 IST2016-07-10T00:52:21+5:302016-07-10T01:08:21+5:30
औरंगाबाद : जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात
औरंगाबाद : जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शून्यावर आलेला विभागातील सरासरी उपयुक्त जलसाठा आठवडाभरातच दोन टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. सद्य:स्थितीत विभागातील सर्व धरणांमध्ये १३५ दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.
मराठवाड्यातील बहुतेक लहान मोठे प्रकल्प यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर विभागातील सर्व प्रकल्पांमधील सरासरी उपयुक्त साठा शून्य टक्क्यावर आला होता. मात्र, गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी आले आहे. लघु, मध्यम आणि मोठ्या अशा सर्वच प्रकल्पांतील जलसाठा किंचित वाढला आहे. मराठवाड्यात सध्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी एक टक्का जलसाठा आहे. विभागात मध्यम प्रकल्पांतील साठ्यात चांगल्या प्रमाणात भर पडली आहे. मराठवाड्यात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. आता या प्रकल्पांमध्ये ३२ दलघमी म्हणजे सरासरी ३.४६ टक्के इतका जलसाठा झाला आहे. तर विभागातील ७३२ लघु प्रकल्पांमध्येही सरासरी ३.२१ टक्के जलसाठा आहे.
विष्णूपुरी, निम्न दुधना आणि पेनगंगा प्रकल्पांचा अपवाद विभागातील आठही मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. दहा दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा ३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. तो आता १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या ७.३८ टक्के आणि पेनगंगा प्रकल्पात दोन टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण अद्यापही मृतसाठ्यातच आहे. जायकवाडीतील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपलेला आहे. तेव्हापासून या धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी वापर सुरू आहे. चालू आठवड्यात या धरणात १० दलघमीची आवक झाली आहे. असे असले तरी मृतसाठ्याची पातळी भरून धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २५२ दलघमी इतक्या पाणीसाठ्याची गरज आहे. त्यानंतरच या धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होणार आहे.