स्पर्धेची सुरुवात, अन् शेवटही श्रमदानानेच !
By Admin | Updated: May 22, 2017 23:33 IST2017-05-22T23:33:18+5:302017-05-22T23:33:58+5:30
धारूर : पाणी फांऊडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धामध्ये अखेरच्या टप्यात जायभायवाडी येथे श्रमदानाच्या कामाला गती आली आहे.

स्पर्धेची सुरुवात, अन् शेवटही श्रमदानानेच !
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : पाणी फांऊडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धामध्ये अखेरच्या टप्यात जायभायवाडी येथे श्रमदानाच्या कामाला गती आली आहे. मागील पंचेचाळीस दिवसांपासून पुरूषाबरोबर महिला श्रमदान करीत आहेत. स्पर्धेत यश मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी शेतीची कामे बाजूला ठेवून कुटूंबातील सर्वजण श्रमदान करीत आहेत.
तालुक्यात वॉटर कप स्पर्धेमध्ये जायभायवाडी, कोळपिंपरी, आम्ला, व्हरकटवाडी, आवरगाव, कारी आदी गावात कामे सुरू आहेत. ग्रामस्थांकडून सर्वच गावात श्रमदानाचे काम करण्यात येत आहे .
पिंपरवाडा गावांतर्गत जायभायवाडी मौजा हे बालाघाटाच्या डोंगरशीत वसलेले गाव आहे. लोकसंख्या पाचशेच्या जवळपास असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते. पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ८ एप्रिलपासून येथे श्रमदानाची कामे करण्यात येत आहेत. या कामात २०० महिला परिश्रम घेत आहेत. सासू व सून सोबतच सकाळी श्रमदानास निघातात. मुलेही आई वडिलांबरोबर श्रमदान करीत आहेत.
दिवस उजाडताच गावकरी घरची कामे उरकून श्रमदानाला निघतात. हनुमान मंदीराजळ महिला - पुरूष एकत्रित येऊन कोणत्या भागात श्रमदान करावयाचे ते निश्चित केले जाते. त्या दिशेने ग्रामस्थ निघतात. २२ मे पर्यंत श्रमदानाचे काम करण्यात येणार आहे. ४५ दिवसांपासून श्रमदानाचे काम सुरू आहे. ग्रामस्थांनी मशागत बाजूला ठेवून श्रमदानात सातत्य ठेवले आहे.
अखेरच्या टप्यात रविवारी सकाळी डॉ. अविनाश पौळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पाणी फांऊडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे, माजी उपनगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी व त्यांच्या सहकार्यानी श्रमदान केले. खोल चर व माती नाला बांधाच्या कामासाठी यंत्राच्या सहाय्याने कामे सुरू आहेत. डिझेल, पैसा अपुरा पडू नये म्हणून अनेकांनी मदत केली आहे.