घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला उत्साही वातावरणात सुरुवात
By Admin | Updated: September 26, 2014 01:56 IST2014-09-26T00:28:08+5:302014-09-26T01:56:14+5:30
औरंगाबाद : घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला.

घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला उत्साही वातावरणात सुरुवात
औरंगाबाद : घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला. विविध भागांतील सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना वाजतगाजत करण्यात आली. देवीचे भक्त पुढील आठ दिवस आता जागर करणार आहेत. पहिल्या माळेपासून शहरात रास दांडियालाही सुरुवात झाली.
नवरात्रोत्सवानिमित्त सकाळपासूनच लगबग सुरू झाली होती. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आज घटस्थापनेचा मुहूर्त होता. मात्र, बहुतांश भाविकांनी घरी सकाळीच घटस्थापना केली. शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील देवीच्या मंदिरात पहाटे ३ वाजेपासून विधिवत महापूजेला सुरुवात झाली. सकाळी ६ वाजता घटस्थापना झाली आणि ७.३० वा. मंदिराचे विश्वस्त दानवे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रती माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको एन-९ येथील रेणुकामाता देवीच्या मंदिरातही देवीची पूजा व घटस्थापना करण्यात आली. हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला.
दुपारी भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने रंगारगल्ली येथील हिंगुलांबिका मातेच्या मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध भागांतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात रात्री उशिरापर्यंत देवीची स्थापना करण्यात आली.
जिल्हा परिषद मैदानावर देवीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. यात विविध मूर्तिकारांनी तयार केलेल्या १० इंचापासून ते १० फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. दुर्गामाता, अंबामाता, सप्तशृंगी देवी, रेणुकादेवीचा मुखवटा अशा विविध रूपांतील देवीच्या मूर्ती एकाच ठिकाणी बघावयास मिळत होत्या.
आकाशपाळणे पहिल्या दिवशी राहिले बंद
कर्णपुरा यात्रेत मनोरंजनाचे खेळ घेऊन आलेल्या ३२ व्यावसायिकांना विविध विभागांची परवानगी मिळविण्यासाठी दिवसभर धावपळ करावी लागली. पीडब्ल्यूडीची परवानगी न मिळाल्याने पहिल्या दिवशी यात्रेतील आकाशपाळणे व्यावसायिकांना बंद ठेवावे लागले. या व्यावसायिकांना लाईट इन्स्पेक्टर, अग्निशामक दल, छावणी पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते. काही खेळण्यांना रात्री उशिरा वीजपुरवठा उपलब्ध झाला होता. एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.