बीअर शॉपी बनल्या बार

By Admin | Updated: June 10, 2017 00:15 IST2017-06-10T00:14:03+5:302017-06-10T00:15:34+5:30

औरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बीअर शॉपी आहेत. या बीअर शॉपीच तळीरामांचे अड्डे बनल्या असल्याचे पाहणीत समोर आले.

Beer shoppiece bar | बीअर शॉपी बनल्या बार

बीअर शॉपी बनल्या बार

राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बीअर शॉपी आहेत. या बीअर शॉपीच तळीरामांचे अड्डे बनल्या असल्याचे पाहणीत समोर आले. बीअर शॉपीतच तळीरामांना पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास, चकणाही उपलब्ध करून दिला आहे. तळीरामांना बीअर बारमध्ये जाऊन अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही अन् बीअर शॉपी मालकांना रिकाम्या बाटल्या, चकणाच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. यामुळे वसाहतींमधील बीअर शॉपी तळीरामांनी गजबजलेल्या दिसून येत आहेत.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर होणारे अपघात हे वाहनचालकांनी ड्रिंक केल्यामुळे घडत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही महामार्गावर ५०० मीटरच्या आत सर्व बीअर बार बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे महामार्गांवर असणाऱ्या बीअर बारला टाळे लागले आहेत. याचा फटका तळीरामांना बसला आहे. जे बीअर बार महामार्गावर नाहीत, त्या ठिकाणी बीअर दर अवाच्या सव्वा पद्धतीने आकारण्यात येतात. हा आर्थिक भुर्दंड सहन करणे दररोज पिणाऱ्यांना कठीण असल्यामुळे अनेकांनी बीअर शॉपीकडे आपला मोर्चा वळवला आहे. विकत घेतलेली बीअर कुठे प्यावी? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घरी घेऊन जाणे शक्य नाही. हॉटेलमध्ये जावे तर मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या सर्व समस्यांवर बीअर शॉपी आणि तळीरामांनी चांगलाच तोडगा काढला आहे. बीअर शॉपीमध्ये चार- पाच खुर्च्या टाकलेल्या दिसून येतात. त्याठिकाणीच एका ग्रुपचे झाले की दुसरा ग्रुप पिण्यासाठी हजर असतो, असा प्रकार बहुतांश बीअर शॉपीवर केलेल्या पाहणीत दिसून आला.

Web Title: Beer shoppiece bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.