‘नो पार्किंग’ मध्येच बीडकरांची ‘पार्किंग’
By Admin | Updated: June 3, 2014 00:43 IST2014-06-02T23:44:53+5:302014-06-03T00:43:27+5:30
बीड: शहरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले असून याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जात आहे

‘नो पार्किंग’ मध्येच बीडकरांची ‘पार्किंग’
बीड: शहरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले असून याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही होत असल्याचे दिसत आहे. पार्किंग करू नये, असा दंडक असतानाही वाहनांचे पार्किंग केले तरी संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. शहरातील सिग्नल तोडण्यातही वाहनधारक आघडीवर असून त्यांच्यावरही कारवाी केली जात नसल्याचे दिसत आहे. शहरातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते आदी भागाची सोमवारी ‘लोकमत’ने पाहणी केली. यामध्ये ज्याठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड आहेत, अशा ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘नो पार्किंग’ असे फलक लावण्यात आले होते व पार्किंगसाठी स्वतंत्र जागा असलेल्या ठिकाणी दिशादर्शक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रवेश केल्यानंतर पार्किंगच्या जागेत केवळ सर्वसामान्यांची वाहने दिसून आली . कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांची वाहने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच उभी करण्यात आलेली होती. तहसील कार्यालय जेथे पार्किंग करू नये, असा फलक लावण्यात आलेला आहे, तेथेच नाकावर टिच्चून पार्किंग करण्याचा प्रकार या कार्यालयाच्या आवारात दिसून आला. जिल्हा परिषद या कार्यालयात अधिकारी, कर्मचार्यांसाठी पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या जागेत पार्किंग न करता जिल्हा परिषदेसमोरच पार्किंग केली जात आहे तर पार्किंगची जागा जुगार खेळण्यासह गप्पा मारण्यासाठी उपयोगात येत आहे. जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा रुग्णालयात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था ढिसाळ दिसून आली. सर्वसामान्यांच्या दुचाकी गेटच्या बाहेर तर ठराविक लोकांच्या गाड्या थेट रुग्णालयाच्या ‘नो पार्किंग’मध्येच पार्किंग करण्यात आल्याचे दिसून आले. यामध्ये कर्मचार्यांच्याही दुचाकी होत्या. तसेच येथील पोलीस चौकीसमोर चक्क पोलिसांनीच आपल्या दुचाकी चौकीसमोर उभ्या करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. शहरातील या कार्यालयांसह मुख्य रस्त्यावरील ‘नो पार्किंग’चे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. मात्र वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ही वाहने सर्रास नो पार्किंगमध्ये उभी केली जात आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे फौजदार प्रवीणकुमार बांगर म्हणाले, आमची कारवाई सुरू आहे. वाहनधारकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)