परराज्याला जोडणारी बीड रेल्वे ठरणार ‘जंक्शन’

By Admin | Updated: August 1, 2014 01:04 IST2014-08-01T00:39:03+5:302014-08-01T01:04:31+5:30

बीड: नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग हा रखडला जरी असला तरी याचे काम आगामी काळात पूर्ण होईल. बीड रेल्वे ही पूर्व-पश्चिम, दक्षिणोत्तर राज्यांना जोडणारे जंक्शन ठरेल,

Beed railway connecting Paraguay to be 'junction' | परराज्याला जोडणारी बीड रेल्वे ठरणार ‘जंक्शन’

परराज्याला जोडणारी बीड रेल्वे ठरणार ‘जंक्शन’

बीड: नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग हा रखडला जरी असला तरी याचे काम आगामी काळात पूर्ण होईल. बीड रेल्वे ही पूर्व-पश्चिम, दक्षिणोत्तर राज्यांना जोडणारे जंक्शन ठरेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी याविषयावर त्यांच्याशी चर्चा केली.
आंदोलन समितीचे नामदेवराव क्षीरसागर, अर्जुनराव जाहेर पाटील, सत्यनारायण लाहोटी, बन्सीधर जाधव, मिठ्ठू गायके, जवाहरलाल सारडा, मंगेश लोळगे, शांतीलाल पटेल, हिरालाल सारडा, रामचंद्र जोशी यांच्या शिष्टमंडळाने रेल्वेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सुरेशकुमार सूरजकर यांनी नगर-अंमळनेरपर्यंत सुरू असलेल्या कामाची तसेच नगर क्रॉसिंग, बुरडगाव ओव्हरब्रिजची पाहणी केली. यासाठीच्या कामाची निविदा अद्याप निघाली नसल्याने हे काम ठप्प असल्याचे यावेळी समोर आले. दरम्यान, नगर-बीड-परळी रेल्वेचे काम गेल्या २७ वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत जवळपास १२.५ कि.मी.पर्यंत रुळ टाकण्यात आले असून, नारायणडोह येथे स्थानक तयार होत आहे. ११० कि.मी.पर्यंत भरीव पुलासह लहान मोठे पूल तयार करण्यात येत आहेत. औरंगाबाद, जालना, नगर, परभणी, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे बीड जिल्ह्यापासून तीन तासाच्या अंतरावर आहेत. नगर-बीड-परळी रेल्वे कार्यान्वित झाली तर जिल्ह्याचा विकास तर होईलच शिवाय आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळेच तर रेल्वे अधिकारी बीड रेल्वे ही जंक्शन ठरेल, असा आशावाद व्यक्त करीत आहेत. रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळाल्यास शेतीपूरक उद्योग, ग्रीन हाऊस, प्लॉस्टिक उद्योग, आॅईल इंडस्ट्री, रिफायनरीज आदींना चालना मिळेल. यासाठी हा रेल्वेमार्ग गतीने पूर्ण होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आंदोलन समितीच्या वतीने पाठपुरावा
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी जिल्हा स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या वतीने हा मार्ग पूर्ण होण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे.
समितीच्या वतीने केंद्र शासनाकडे रेल्वे कामाच्या पूर्ततेसाठी निधीची मागणी केली जात आहे. स्व. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही बीड रेल्वेचे काम पूर्ण होण्यासाठी निधीची मागणी केंद्रात केली होती. त्यांच्या मागणीला काही प्रमाणात यश आले होते.
त्यामुळेच केंद्राने निधी दिला होता. तसेच केंद्र व राज्य यांच्या भागीदारीतून हा मार्ग पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला होता. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत आंदोलन समितीच्या वतीने याचा सतत पाठपुरावा केला जात आहे. यावर्षी रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलेल्या बजेटमध्ये बीडच्या रेल्वेसाठी केवळ २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा महामार्ग पुन्हा मंदगतीने सुरू राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रेल्वे खात्याला हवा व्यावसायिक भाग
ज्याठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया आहे तसेच मालाची वाहतूक केली जाते त्याठिकाणी रेल्वेचे काम गतीने होते. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग, व्यवसाय कमी असल्यामुळे याठिकाणी होणाऱ्या रेल्वेचे काम मंदगतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र ुजिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास केला असता रेल्वे खात्यासाठी बीड जिल्हा व्यावसायिकदृष्ट्या पूरक ठरणार आहे. बीड जिल्ह्याला सहा जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीसह मालाची वाहतूक होईल. त्यामुळे बीड जिल्हा हा नेहमीच लाभदायक ठरणार आहे. दरवर्षी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी तुटपुंजा निधी दिला जातो. त्यामुळे याचे काम अद्यापही रखडलेलेच आहे. हळुहळू होणाऱ्या कामामुळे जिल्ह्यातील रेल्वे कधी सुरू होईल, याची शाश्वती देणे शक्य नाही. ज्याठिकाणी कामे सुरू आहेत त्याठिकाणची कामे निविदेअभावी बंद पडते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. बुरडगाव ओव्हरब्रिजचे काम केवळ निविदा न निघाल्यामुळेच रखडले आहे. अपुरी तरतूद केल्यामुळे १४ वर्षात नगर ते नारायणडोह या १४ कि.मी. अंतराचा रुळ अंथरण्याचे काम झाले आहे. नारायणडोह ते अंमळनेरपर्यंत माती व पुलांचे काम सुरू आहे. हे काम २००० पासून सुरू झाले आहे. यासाठी आतापर्यंत ३०९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यात १५८ कोटी हे केंद्र तर १७८ कोटी राज्य सरकारचा वाटा आहे.
तरुणांच्या हाताला मिळेल काम
नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग सुरू झाला तर जिल्ह्यात मोठमोठ्या उद्योगांना सुरुवात होईल. कारण याठिकाणावरुन माल वाहून नेणे लाभदायक ठरणार आहे. बीड जिल्ह्याला ६ जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. तसेच त्या भागातून इतर राज्येही जवळ आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची रेल्वे सुरू झाली तर मोठमोठे उद्योग जिल्ह्यात स्थिरावतील. उत्पादनाची ने-आण करण्यासाठी फारशी अडचण येणार नाही. यासाठी हा महामार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे. मोठे उद्योग जिल्ह्यात सुरू झाले तर त्याचा लाभ तरुणांना होईल. त्यांच्या हाताला कामे तर मिळतीलच. शिवाय इतर भागातील उद्योगही जिल्ह्यात येतील.
जनआंदोलनाची गरज
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. २००० ते २०१४ पर्यंत केवळ १४ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी रुळ तर काही ठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. प्रत्येकवेळी रेल्वे अर्थसंकल्पात नगर-बीड-परळीसाठी तुटपुंजा निधी दिला जातो. त्यामुळे कामाला गती मिळत नाही. बहुतांश कामे निधीअभावीच रखडली आहेत. जिल्ह्यातील रेल्वेचे काम पूर्ण होण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता आहे. वारंवार मोठ्या निधीची मागणी केली तरच याची दखल घेतली जाईल तेव्हा कुठे अधिक निधी मिळू शकतो.
जनआंदोलन झाल्याशिवाय हे काम मार्गी लागेल याची शाश्वती आता तरी देता येणे शक्य नाही. (प्रतिनिधी)
पुढाऱ्यांनी घेतला पाहिजे पुढाकार

बीड जिल्ह्यातील नेते मागणी लावून धरत नसल्याने प्रश्न रखडलेलाच
रेल्वे सुरू झाल्यास लाखो बेरोजगारांना हाताला मिळतील कामे
दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात नगर-बीड-परळी रेल्वेसाठी तुटपुंजी तरतूद
भरीव निधीसाठी मोठ्या जनआंदोलनाची गरज
जिल्हा स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचा पाठपुरावा
आगामी पाच वर्षात रेल्वेचे काम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली

Web Title: Beed railway connecting Paraguay to be 'junction'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.