बीड शहरात १५ लाखांचा गुटखा पकडला

By Admin | Updated: July 27, 2015 01:13 IST2015-07-27T00:37:10+5:302015-07-27T01:13:03+5:30

बीड: शहरातील शाहूनगर भागातील एका घरामध्ये पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास छापा टाकून तब्बल १४ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा पकडला

Beed caught a gutka of Rs 15 lakh in the city | बीड शहरात १५ लाखांचा गुटखा पकडला

बीड शहरात १५ लाखांचा गुटखा पकडला


बीड: शहरातील शाहूनगर भागातील एका घरामध्ये पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास छापा टाकून तब्बल १४ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा पकडला. वर्षभरातील गुटख्यावरील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
शेख राजु शेख सगीर अहमद (रा. शाहु नगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे. पोलीस अधीक्षक पारसरकर यांच्या पथकातील व शिवाजीनगर ठाण्याचे सपोनि गजानन भीमराव जाधव यांना खबर मिळाली की, शाहूनगर भागातील बीएसएनएल कार्यालयसमोरच्या भागातील एका घरात लाखो रुपयांचा गुटखा आहे. त्यावरुन सपोनि जाधव हे फौजफाट्यासह तेथे गेले. त्यांनी शेख राजू याच्या घरात प्रवेश करुन तपासणी केली असता एका खोलीमध्ये गोण्या असल्याचे दिसून आले. त्यापैकी काही गोण्या फोडल्या असता त्यात गुटख्याची पाकिटे असल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोलीस छापा टाकणार असल्याची माहिती शेख राजू यास मिळताच तो पळून गेला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुटखा जप्तीची कारवाई पूर्ण केली. जप्त गुटख्याचे मूल्यमापन केले असता ४९ गोण्यांमध्ये १४ लाख ७० हजार रुपयांचा माल असल्याचे समोर आले.
रविवारी सकाळी प्रभारी सहायक आयुक्त सागर तेरकर यांना या छाप्याची माहिती देण्यात आली. तेरकर यांच्या फिर्यादीवरुन शेख राजू शेख सगीर अहमद याच्याविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि यु.व्ही. बारवकर करीत आहेत.
मुख्य आरोपीचा शोध सुरूच
शाहूनगर भागात शेख राजू याच्या घरावर छापा टाकुन जवळपास १५ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. आरोपीने इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा कोठुन आणला?, कोणी दिला ? कसा दिला ? आदी माहिती घेतली जाणार असल्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितले. आरोपीचा शोध सुरु असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Beed caught a gutka of Rs 15 lakh in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.