मोदींच्या प्रभावामुळे अदावळेंचे घुमजाव
By Admin | Updated: May 27, 2014 00:56 IST2014-05-27T00:29:34+5:302014-05-27T00:56:56+5:30
जळकोट : गुढी पाडव्याच्या दिवशी बीड येथे खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत आपण भाजपात प्रवेश घेतला होता.

मोदींच्या प्रभावामुळे अदावळेंचे घुमजाव
जळकोट : गुढी पाडव्याच्या दिवशी बीड येथे खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत आपण भाजपात प्रवेश घेतला होता. तथापि, काँग्रेसमधील काही जणांच्या दबावापोटी काँग्रेसमध्येच असल्याचे सांगावे लागत होते असा आव आणत खा. मुंडे यांच्या उपस्थितीत केलेला आपला भाजपातील प्रवेश कायमच असल्याचा दावा लक्ष्मणराव अदावळे यांनी जळकोट येथे केला़ मोदी लाट व भाजपाच्या विजयानंतर त्यांनी दोन डगरीवरची आपली भुमिका तर बदलली नाही ना, अशी चर्चा आहे़ यावेळी अदावळे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याने आपण भाजपात जात नसून यापुर्वीच एक कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करण्यामागे आपली कोणतीही अपेक्षा नसून, पक्ष हेच आपले सर्वस्व मानून मी यापुढील कालावधीतही काम करणार आहे. काँग्रेसमधील काही नेतेमंडळींकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने ते म्हणाले़ मात्र कोणाचेही नाव घेतले नाही़ आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नये यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले़ पुढील कालावधीत समाजाची सेवा करण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केला आहे. मोदी विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी भाजपाचे खादर लाटवाले, शिवानंद देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)