बीड पालिकेत अनागोंदी !
By Admin | Updated: June 9, 2017 00:58 IST2017-06-09T00:57:36+5:302017-06-09T00:58:20+5:30
बीड : येथील नगरपालिकेतील गैरव्यवहार गुरुवारी उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला आहे.

बीड पालिकेत अनागोंदी !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील नगरपालिकेतील गैरव्यवहार गुरुवारी उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला आहे. लेखा विभागातील कॅशबूक व संचिकांची मागील पाच महिन्यांपासून कसलीच नोंद नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. नोंद नसल्याने लाखोंचा व्यवहार खाजगीत झाल्याचा आरोप उपनगराध्यक्षांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बीड नगरपालिका मागील निवडणुकीपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. पुन्हा एकदा लेखा विभागातील गैरकारभारावरून पालिका चर्चेत आली आहे. गुरुवारी दुपारी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापती फारुख पटेल व बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी लेखा विभागातील माहिती मागविली असता लेखापालास ती देता आली नाही. गुरुवारी दिवसभरात पालिकेत १ लाख २० हजार रुपये रक्कम जमा झाली होती. ही रक्कम कुठे आहे, असे हेमंत क्षीरसागर यांनी लेखापालास विचारले असता त्यांची भंबेरी उडाली. उत्तर देताना हातात केवळ ५० हजार रुपयेच असल्याचे दिसले. राहिलेले ७० हजार रुपये कुठे गेले, याबाबत विचारणा केली असता पालिकेतीलच एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला दिल्याचे लेखापालाने कबूल केले.
पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे चिडलेल्या उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी लेखापालासह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. येथे पुराव्यानिशी हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच पालिकेतील इतर सोयी-सुविधा व गैरकारभाराचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखविला. हे ऐकून उपस्थितही अवाक झाले.
लेखापाल गणेश पगारे यांची अंबाजोगाईला बदली झाली आहे; परंतु त्यांनी अद्यापही संचिका, कॅशबूक व इतर महत्त्वाचे दस्तऐवज पालिकेकडे सुपुर्द केले नाहीत. तसेच पालिकेतही ते येत नाहीत. घरी बसून लाखोंचे व्यवहार नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर व अमर नाईकवाडे यांनी केला आहे.
नगराध्यक्षांविरोधात आरोप
जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचत असताना पालिकेतील सर्व गैरव्यवहार हे नगराध्यक्ष यांच्या सांगण्यावरूनच अधिकारी, कर्मचारी करीत असल्याचा आरोप हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारूख पटेल यांनी केला. यावेळी बाळासाहेब गुंजाळ, इद्रिस हाश्मी, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, प्रभाकर पोपळे, सम्राट चव्हाण, गणेश तांदळे, जैतुल्ला खान यांच्यासह लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारीही यात दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.