उपाययोजनांसाठी प्रशासन झाले सज्ज
By Admin | Updated: August 20, 2014 01:53 IST2014-08-20T01:44:44+5:302014-08-20T01:53:28+5:30
बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे़ पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे़ यापुढे पाऊस नाही पडला

उपाययोजनांसाठी प्रशासन झाले सज्ज
बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे़ पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे़ यापुढे पाऊस नाही पडला तर येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी बैठक घेतली़ बैठकीला उपजिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती़
आज स्थितीत आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे़ तसेच धारूर, अंबाजोगाई व परळी येथे देखील पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे़ यापुढील काळात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा यावेळी राम यांनी घेतला. यामध्ये आष्टी, शिरुर कासार व पाटोदा या भागात पिण्याच्या पाण्याची व जनावराच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने यापुढील काळात वरील तालुक्यात उपाययोजना करण्यासंबंधी संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. याबरोबरच धारुर व केज येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित तहसीलदारांनी आतापर्यंत काय केले आहे, याबाबतची माहिती जाणून घेतली. पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक असल्याने जिल्ह्यातील पशुधन संकटात सापडले आहे. यामुळे चारा उपलब्ध करण्याबाबत काय करता येऊ शकते? यासंबंधी चर्चा झाली आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)