सावधान ! धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST2021-09-13T04:04:38+5:302021-09-13T04:04:38+5:30
श्यामकुमार पुरे सिल्लोड : गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व आमसरी येथील अंबऋषी मंदिराजवळील धबधबा ...

सावधान ! धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व आमसरी येथील अंबऋषी मंदिराजवळील धबधबा ओसंडून वाहत आहे. निसर्गरम्य वातावरणात खळखळणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करीत आहे; परंतु या पर्यटनस्थळी काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फी काढतात; पण पर्यटकांना सावधान सेल्फीचा मोह जिवावरदेखील बेतू शकतो, याचा विचार करूनच खबरदारी घेण्याचे आवाहन पर्यटन विभागाकडून केले जात आहे. लेणीत दररोज ५०० ते ६०० पर्यटक दाखल होतात. डोंगरावरून जवळपास दोन हजार फूट खोल लेणीच्या कुशीत खळाळणारा धबधबा दिसतो. धबधब्याजवळ फोटोसेशन करण्यासाठी यातील जवळपास ५० टक्के पर्यटक जातात, तसेच आमसरी येथील अंबऋषी येथील धबधबा ओसंडून वाहत असून, महादेवाचे मंदिर व धबधबा हे दोन्ही दृश्य एकत्र सेल्फीमध्ये यावे यासाठी जीव धोक्यात घालून पर्यटकांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असतो; पण यात धोका निर्माण झाला आहे.
---
पर्यटकांनी काय घ्यावी काळजी..
एकटे जाऊ नये
अजिंठा लेणीसमोरील व्ह्यू पॉइंटवरून काही पर्यटक धबधबा बघण्यासाठी जातात. येथे जाताना आधी या डोंगरात बिबट्याचा वावर आहे, याची जाणीव करून पर्यटकांनी डोंगरातून आवाज करीत मोबाइलवर गाणे वाजवीत जावे. हातात काठी ठेवावी. एकटे डोंगरातून जाऊ नये.
----
लांबूनच सेल्फी काढा
अजिंठा लेणीच्या पायथ्यापासून वनविभागाच्या गार्डनजवळूनही हा आकर्षित धबधबा बघता येतो; पण येथे पाण्यामुळे सर्व दगडांवर शेवाळ आले आहे. या ठिकाणी जाणे टाळावे. धबधब्याचे पाणी ज्या कुंडात पडते तो कुंड खूप खोल आहे. आता धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे दूरवरूनच हा क्षण मोबाइलमध्ये घ्यावा.
----
गायमुखाजवळ न जाण्याचे आवाहन
आमसरी येथील धबधबा हा गायमुखातून खाली कोसळतो. खाली महादेवाचे मंदिर आहे. पर्यटक गायमुखाच्या तोंडाजवळ जाऊन धबधबा व मंदिर येईल असा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यामुळे धोका निर्माण होत असून, दूरवरून डोंगराच्या पायऱ्याजवळ सेल्फी घेऊ शकतात.
----
कोट
अन्यथा कार्यवाही करू
अजिंठा डोंगरावरील धबधब्याजवळ अनेक पर्यटक सेल्फी काढण्यासाठी जातात. तेथे आम्ही चार ते पाच वनमजूर, वनरक्षक तैनात केलेले आहेत; पण काही पर्यटक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. ऐकत नाहीत व जीव धोक्यात घालतात न ऐकणाऱ्या पर्यटकांविरुद्ध आम्ही कठोर कार्यवाही करणार आहोत.
- नीलेश सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा वनविभाग
-----
दोन वर्षांपूर्वी घडली होती दुर्घटना
दोन वर्षांपूर्वी अजिंठा लेणीच्या धबधब्यावर सेल्फी काढणाऱ्या एका पर्यटकाचा कुंडात पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पर्यटन व पुरातत्व विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून सुरक्षारक्षकांची नेमणूक केली गेली. मात्र, काही पर्यटक नियमांची पायमल्ली करून तेथील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
फोटो : अजिंठा लेणीचा ओसंडून वाहणारा धबधबा.
120921\img_20210911_175001.jpg
अजिंठा लेणीचा ओसंडून वाहणारा धबधबा