बीडीओंकडून टँकर फेऱ्यांची गोळाबेरीज !
By Admin | Updated: April 8, 2015 00:51 IST2015-04-08T00:40:07+5:302015-04-08T00:51:50+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील १३ गावांत मंजूर फेऱ्यांपेक्षा टँकरच्या कमी फेऱ्या झाल्याची बाब ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आली आहे़ यासंदर्भात जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले

बीडीओंकडून टँकर फेऱ्यांची गोळाबेरीज !
लातूर : लातूर जिल्ह्यातील १३ गावांत मंजूर फेऱ्यांपेक्षा टँकरच्या कमी फेऱ्या झाल्याची बाब ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आली आहे़ यासंदर्भात जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील दहाही बीडीओंकडून टँकर फेऱ्यांची गोळाबेरीज सुरु आहे़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल देण्यासाठी बीडीओंकडून ग्रामसेवकांची झाडाझडती होत आहे़ १३ पैकी काही गावांच्या सरपंचांनी कमी फेऱ्या होत असल्याचे गऱ्हाणे मांडले आहे़ तर ग्रामसेवकांनी मात्र मंजुरीप्रमाणेच फेऱ्या होत असल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांकडे जाब विचारणे सुरु केले आहे़ दरम्यान, आतापर्यंत फक्त तीन बीडीओंनीच टँकर फेऱ्यांचा अहवाल सीईओंकडे सादर केला आहे. सात बीडीओंनी सीईओंच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आहे.
लातूर जिल्ह्यात ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून ४६ पैकी खाजगी २७ तर शासकीय १९ टँकर आहेत़ या टँकरद्वारे दररोज १५४ फेऱ्या मंजूर आहेत़ परंतु रविवारी ‘लोकमत’चमुने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये लातूर जिल्ह्यातील शाम नगर, रामेगाव तांडा, बाभळगाव, महाराणाप्रताप नगर, गंगापूर, दर्जी बोरगाव, महाळंग्रावाडी, विळेगाव, घारोळा, हाडोळी, हणमंत जवळगा, आष्टा, नारायण नगर या १३ गावांत कुठे एक तर कुठे दोन फेऱ्या कमी झाल्याची बाब उघडकीस आली़ एकूण १८ फेऱ्या कमी झाल्या़ टँकर फेऱ्यांचा गोलमाल ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आला़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जीपीएस सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला असून, १८ फेऱ्या कमी का झाल्या, याचा शोध घेण्यासही प्रारंभ केला आहे़
डिजेल अभावी, दुरुस्ती अभावी टँकर बंद होते का किंवा जाणीवपूर्वक फेरी केली नाही, याचाही शोध प्रशासनाकडून सुरु आहे़ फेरी न करताच दप्तरात या फेऱ्यांची नोंद केली का, या अनुषंगाने बीडीओंना तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ या सूचनेनुसार जिल्ह्यातील दहाही गटविकास अधिकारी संबंधीत गावच्या ग्रामसेवकाला जाब विचारत आहेत़ किती फेऱ्या मंजूर आहेत़ रविवारी किती झाल्या होत्या़ आता मंजुरीप्रमाणे होत आहेत का, रविवारी कमी होण्याचे कारण काय होते़ याची दप्तरी नोंद आहे का, या सर्व बाबींचा खुलासा ग्रामसेवकांकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले़ शिवाय, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनीही प्रस्तुत माहिती बीडीओंकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितली असल्याचे सांगितले़
(अधिक वृत्त हॅलो/ २ वर)