आता लढाई काका-पुतण्याची़़?
By Admin | Updated: June 13, 2014 00:34 IST2014-06-13T00:03:54+5:302014-06-13T00:34:04+5:30
गोविंद इंगळे, निलंगा राज्याचे लक्ष वेधणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसकडून शिवाजीराव की अशोकराव याचीच जोरदार चर्चा रंगली आहे़

आता लढाई काका-पुतण्याची़़?
गोविंद इंगळे, निलंगा
राज्याचे लक्ष वेधणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसकडून शिवाजीराव की अशोकराव याचीच जोरदार चर्चा रंगली आहे़ १९९५ पासून माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील यांचे चिरंजीव जि़प़ उपाध्यक्ष अशोकराव पाटील इच्छुक आहेत़ परंतु, त्यांच्या नशिबी उपेक्षाच आली आहे़ परंतु, यावेळी त्यांनी जोरदार तयारी केली आहे़ दुसरीकडे भाजपातून संभाजीराव पाटील यांचे मनसुबे काही औरच सांगत आहेत़ त्यांच्याकडून आई माजी खासदार रुपाताई किंवा पत्नी प्रेरणा यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु असल्याचे समर्थकांतून सांगण्यात येत आहे़
२००९ साली झालेल्या निवडणुकीत डॉ़शिवाजीराव पाटील यांनी नातू संभाजीराव पाटील यांचा साडे सात हजार मतांनी पराभव केला होता़ मात्र यावेळी लोकसभेत ५२ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाल्याने भाजपा उत्साहित आहे़ केंद्रातील यश आणि मोदी लाटेच्या बळावर भाजपाकडून यावेळी माजी खासदार रुपाताई किंवा प्रेरणा पाटील यांच्यासाठी संभाजीराव प्रयत्न करीत असल्याचे समजते़ ते स्वत: बढतीवर जाण्याच्या प्रयत्नात आहेत़ तशी जोरदार तयारीही त्यांच्याकडून सुरु आहे़ दरम्यान, १९९५ पासून हुलकावणी देत असलेली आमदारकी यावेळी पटकावायचीच या ध्येयाने जि़प़ उपाध्यक्ष अशोकराव पाटील तयारीला लागले आहेत़ ते स्वत:च काँग्रेसकडून इच्छुक असल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केलो होते़ परंतु, मोदी लाटेपुढे त्यांची मात्रा चालली नाही़ परंतु, लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीचे परिमाण वेगळे असतात, चित्र वेगळे दिसून येईल, या आशेवर अशोकराव पाटील यांनी उत्साह खचू दिला नाही़ तिकिट कोणासही मिळाले तरी विधानसभा निवडणूक प्रचाराचा रिमोट काँग्रेसकडून अशोकराव पाटील निलंगेकर तर भाजपाकडून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडेच राहणार आहे़ त्यामुळे निलंगा विधानसभेकडे यावेळी आजोबा-नातवाची नव्हे तर काका-पुतण्याची लढाई म्हणून पहावे लागणार आहे़ दरम्यान, दोन्हीकडील निलंगेकरांवर घराणेशाहीचा आरोप करीत मनसेकडून जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी मैदानात उडी घेतली आहे़ काका-पुतण्याच्या लढाईत आपला मार्ग मोकळा असल्याचा दावा साळुंके करीत आहेत़ परंतु, निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतदार यावेळी कोणाला संधी देणार, हे काळच सांगू शकेल़
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते...
काँग्रेसडॉ़शिवाजीराव पाटील ७८२६७
भाजपासंभाजीराव पाटील ७०७६३
बसपामोहम्मद रफी सय्यद १०३१५
इच्छुकांचे नाव पक्ष
डॉ़शिवाजीराव पाटील काँग्रेस
अशोकराव पाटील काँग्रेस
रुपाताई पाटील, प्रेरणा पाटील भाजपा अभय साळुंके मनसे