जवळा येथे दारू विक्रेत्यास बेदम चोप
By Admin | Updated: April 27, 2015 00:57 IST2015-04-27T00:52:26+5:302015-04-27T00:57:37+5:30
शिराढोण : महिला, ग्रामस्थांनी गावात कायदेशीर मार्गाने दारूबंदी केलेली असतानाही एक जण अवैधरित्या दारू विक्री करीत होता़ वारंवार सूचना देवूनही दारूविक्रीचा धंदा सुरूच ठेवणाऱ्या

जवळा येथे दारू विक्रेत्यास बेदम चोप
शिराढोण : महिला, ग्रामस्थांनी गावात कायदेशीर मार्गाने दारूबंदी केलेली असतानाही एक जण अवैधरित्या दारू विक्री करीत होता़ वारंवार सूचना देवूनही दारूविक्रीचा धंदा सुरूच ठेवणाऱ्या त्या दारूविक्रेत्यास जवळा (खु़ ताक़ळंब) ग्रामस्थांनी रविवारी सकाळी चांगलाच चोप दिला़ याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी झालेल्या दारूविक्रेत्याने ग्रामस्थांविरोधातही मारहाणीची तक्रार दिली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळा खुर्द येथील ग्रामस्थांनी मागील काही महिन्यापूर्वी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेवून दारूबंदी लागू केली आहे़ मात्र, गावाच्या परिसरात फुलचंद जलद्या पवार हा सुभाष पवार यांच्या शेतातील मोसंबीच्या बागेजवळ अवैधरित्या दारूविक्री करीत होता़ याबाबत ग्रामस्थांनी त्याला दारूविक्री बंद करण्याबाबत वारंवार सूचना केल्या होत्या़ मात्र, सतत सूचना करूनही पवार ऐकत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी रविवारी सकाळीच त्याला चांगलाच चोप दिला़ दारूविक्रीवरून जवळा खुर्दमध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळताच शिराढोण पोलीस ठाण्याचे सपोनि संभाजी पवार हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य, ४०० लिटर रसायन आढळून आले़ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून फुलचंद पवार याला ताब्यात घेतले़ याबाबत सपोनि संभाजी पवार यांनी फिर्याद दिली असून, पवार याच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात कलम ६५ (क) दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामस्थांच्या मारहाणीत फुलचंद पवार हा जखमी झाला होता़ त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
दरम्यान, फुलचंद पवार यानेही ग्रामस्थांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार शिराढोण पोलीस ठाण्यात दिली आहे़ त्याच्या फिर्यादीवरून साहेबराव आनंदराव पवार, सुभाष बब्रुवान पवार, धोंडीराम अंबऋषी समुद्रे, दिलीप नामदेव हंडीबाग, बाबा पांडुरंग पवार, परसराम बालाजी भोरे, विशाल बाबासाहेब पवार, अशोक उत्तम लोमटे व बालाजी मुरली पवार यांच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना सुनिल ईगवे, विजयकुमार राठोड हे करीत आहेत़ (वार्ताहर)