दोन हजार विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 23:23 IST2016-01-16T23:21:03+5:302016-01-16T23:23:54+5:30
परभणी : शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या वतीने जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ४३ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले

दोन हजार विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार
परभणी : शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या वतीने जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ४३ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले असून, या वसतिगृहाच्या माध्यमातून २ हजार १०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा लाभ होताना दिसत आहे.
राज्यातील मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या मजुरांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातून कामगारही मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीसाठी जात असतात. तसेच जिल्ह्यात साखर कारखान्यावर बरेच कामगार अवलंबून आहेत. मजुरांससोबत त्यांची पाल्यही त्यांच्यासोबत जात होते. त्यामुळे या पाल्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत होता. शिक्षणात सातत्य राहत नसल्याने शाळाबाह्यमुलांच्या संख्येमध्ये वाढ होते. तसेच कामही हंगामी असल्याने काही पाल्यांना शाळेत जावेसे वाटले तरी या दरम्यानच्या काळात बराच अभ्यासक्रम वाया जात होता. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हंगामी निवासी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऊसतोड कामगारांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेमध्ये त्यांच्या निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने सुरू केलेले वसतिगृह या पाल्यांसाठी लाभदायक ठरताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये २०१५-१६ या वर्षामध्ये ४३ वसतिगृहांना मान्यता दिली असून यामध्ये २ हजार १०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पालम तालुक्यात रामपूर तांडा, रेवा तांडा, सिरसम, चाटोरी, लांडकवाडी, सोनेरी तांडा आशा ६ वसतिगृहांमध्ये २८० विद्यार्थी, मानवत तालुक्यात रामेटाकळी, किन्होळा बु., कोल्हा, कुंभारी तांडा, सारंगापूर, केकरजवळा अशा ६ वसतिगृहांमध्ये २३०, पाथरी तालुक्यातील बाबूलतार, देवनांद्रा ग्रामीण, मसला तांडा, कानसूर वस्ती, कानसूर, पाथरगव्हाण बु., कासापुरी, गुंज खूर्द अशा ८ वसतिगृहामध्ये ४६२ विद्यार्थी, परभणी तालुक्यात आमडापूर, ब्रह्मपुरी तांडा, विजयनगर तांडा, ताडलिमला अशा ४ वसतिगृहामध्ये १२७ विद्यार्थी, गंगाखेड तालुक्यातील सुप्पा तांडा, बोथी, बोथी तांडा, घटांग्रा, चंदू नाईक तांडा, थावरू नाईक तांडा, बडवणी, इसाद, बोर्डा, इरळद, गोदावरी तांडा, दामपुरी, देवकतवाडी, ढवळकेवाडी, पिंपळदरी, वरवंटी, धर्मापुरी तांडा, देवला नाईक तांडा, धारासूर तांडा अशा १९ वसतिगृहामध्ये १ हजार ५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ डिसेंबरपासून हे वसतिगृह सुरू झाले असून ३१ मार्चपर्यंत चालणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)