गलधर युवा मंचचा निराधार अरूणाला मदतीचा आधार
By Admin | Updated: September 9, 2015 00:03 IST2015-09-09T00:03:10+5:302015-09-09T00:03:10+5:30
बीड : शेती नाही, घर नाही अशा परिस्थितीत हाताला कामही मिळेना. एवढ्यात नऊ वर्षांचा चिमुकला आजारी पडला. त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसा नाही.

गलधर युवा मंचचा निराधार अरूणाला मदतीचा आधार
बीड : शेती नाही, घर नाही अशा परिस्थितीत हाताला कामही मिळेना. एवढ्यात नऊ वर्षांचा चिमुकला आजारी पडला. त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसा नाही. म्हणून कंटाळलेल्या अरूणा राजेश गोते या आत्महत्या करण्यास निघाल्या होत्या. ऐनवेळी स्व. अमोल गलधर युवा मंचने चिमुकल्यावर उपचार करून त्या कुटुंबाला मदतीचा आधार दिला.
नाळवंडी नाका भागात अरूणा गोते या दोन मुलांसह राहतात. पती राजेश गोते हे पुणे जिल्ह्यातील माळीण येथे कोसळलेल्या दरडीत मरण पावले. त्यांचे प्रेतही हाती लागले नाही. मदतही मिळाली नाही. कर्ता पुरूष गेल्याने अरूणावर जबाबदारी वाढली. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना मुलगा झाला. त्यामुळे जबाबदारीत आणखीनच भर पडली. याच नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला साथरोग जडल्याने उपचारासाठी पैसा नव्हता. बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी चिमुकल्यावर मोफत उपचार केले. तसेच युवा मंचचे स्वप्नील गलधर, संदीप उबाळे, विजय लव्हाळे, संभाजी सुर्वे, दिनेश डेंगे, भाऊ साळुंके, पवार यांनी वर्षभर पुरेल एवढा किराणा, कपडे, पाण्याची टाकी मदत म्हणून दिली. तसेच नऊ महिन्याच्या चिमुकल्यासह तीन वर्षांच्या मुलाच्या आयुष्यभराच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. मंचच्या या सामाजिक कार्याने एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्यांना अशीच मदत करावी, असे स्वप्नील गलधर म्हणाले.(प्रतिनिधी)