व्यवसायाला मिळाला गटाचा आधार
By Admin | Updated: December 26, 2016 23:48 IST2016-12-26T23:46:04+5:302016-12-26T23:48:19+5:30
भूम : चौदा वर्षांपूर्वी महिला दिनाचे औचित्य साधून रुक्मिणी महिला बचत गट हा शहरातील पहिला महिला बचत गट स्थापन झाला

व्यवसायाला मिळाला गटाचा आधार
भूम : चौदा वर्षांपूर्वी महिला दिनाचे औचित्य साधून रुक्मिणी महिला बचत गट हा शहरातील पहिला महिला बचत गट स्थापन झाला. पाहता-पाहता या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असून, या गटाकडून कर्ज घेऊन दहा महिलांनी वेगवेगळ्या व्यवसायात आपले पाय रोवले आहेत. काही सदस्यांच्या मुलींच्या लग्नालाही या गटाचा हातभार लागला आहे.
८ मार्च २०१२ रोजी पुष्पा चंद्रकांत डोंबाळे यांच्या पुढाकारातून या बचत गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शिवशंकर नगरात महिलांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी शंभरावर महिलांची उपस्थिती होती; परंतु गटात सहभागी होण्यासाठी अवघ्या नऊ महिलांनी पुढाकार घेतला. दहावी महिला सदस्य मिळत नसल्यामुळे अखेर किवाबाई अकरे यांचे नाव समाविष्ट करून त्यांचे हप्तेही डोंबाळे यांनीच भरण्यास सुरूवात केली. मात्र, हळूहळू बचतीचे महत्त्व अकरे यांच्याही लक्षात आल्यामुळे नंतर त्यांनी स्वत:च हप्ते भरण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे, अकरे यांनीच या बचत गटातून पहिल्यांदा पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले. शिवाय गटाच्या माध्यमातून त्यांनी एक गाय खरेदी करून दुग्ध व्यवसायही सुरू केला. यामुळे त्यांच्या कुटुंबास चांगला आर्थिक हातभार लागला.
काही दिवसानंतर या गटाच्या सदस्या लता अशोक भगत यांच्या मुलीच्या विवाहासाठी पैशांची आवश्यकता होती. तेव्हाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून गटासाठी पंचेवीस हजारांचे कर्ज उचलून ही रक्कम गटातील सर्व सदस्यांच्या संमतीने भगत यांच्या मुलीच्या लग्नासाठी देण्यात आली.
या गटाच्या वतीने २०१४ मध्ये रुक्मिणी महिला कृषी सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. सदस्या कालिंदा बापू शिंदे यांच्या जागेत हे दुकान सुरू करण्यात आले असून, सीताबाई अकरे या सदर दुकान चालवित आहेत. या केंद्रातून बी-बियाणे, खतांची खरेदी करून कालिंदा शिंदे यांनी त्यांच्याच शेतात आता भाजीपाला पिकविण्यास सुरूवात केली आहे. यासोबतच कुणी पिठाची चक्की, कुणी किराणा दुकान तर कुणी शेळी पालन यासारखे दहा व्यवसाय या गटाच्या सदस्यांनी सुरू करून संसाराला हातभार लावला आहे.