‘झेडपी’ अध्यक्षपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग
By Admin | Updated: September 1, 2014 01:07 IST2014-09-01T00:53:32+5:302014-09-01T01:07:52+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापींच्या निवडीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड २१ सप्टेंंबर रोजी होणार आहे.

‘झेडपी’ अध्यक्षपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापींच्या निवडीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड २१ सप्टेंंबर रोजी होणार आहे. तर पंचायत समिती सभापतींची निवड प्रक्रिया १४ सप्टेंबर रोजी होईल. यासंदर्भात २८ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेला शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जि.प.चे अध्यक्षपद खुले असल्याने या पदावर विराजमान होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.
५४ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक २०, त्यापाटोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे १९, शिवसेना १४ तर भाजपा १ असे पक्षीय बलाबल आहे. सध्या काँग्रेस आणि शिवसेना-भाजप सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपद आणि पशुसंवर्धन व कृषी सभापतीपद काँग्रेसकडे तर बांधकाम, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापतीपद शिवसेनेकडे देण्यात आले आहे. उपरोक्त पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत आल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. २१ सप्टेंबर रोजी निवड प्रक्रिया घेण्याबाबत जिल्हा परिषदेला आदेशित करण्यात आले आहे. उर्वरित अडीच वर्षासाठी अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या पदासाठी काँग्रेमधील अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे पूत्र धिरज पाटील, वाशी तालुक्यातील प्रशांत चेडे आणि लोहारा तालुक्यातील दीपक जवळगे यांची नावे चर्चेत आहेत. असे असेले तरी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आणि माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचे ज्या उमेदवाराच्या नावावर एकमत होईल, त्याच सदस्याला अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार संघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध सेना-भाजप अशा लढती होतात. असे असतानाच जिल्हा परिषदेत मात्र, काँग्रेस आणि सेना-भाजप सत्तेत राहिल्यास त्याचा मतदारांमध्ये वेगळा संदेश जाईल. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी तरी काँग्रेसेने शिवसेना-भाजपासोबत सत्तेत राहू नये, अशा स्वरूपाचा मतप्रवाह असणारा एक गट काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. त्यामुळे स्थानिक पक्षश्रेष्ठी या गटाचे ‘मत’ किती गांभिर्याने घेतात हेही पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना-भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून सत्ता स्थापन केली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट अध्यक्षपदावर दावा केला जाण्याचीही शक्यता आहे. अशावेळी इच्छुकांच्या रांगेत महेंद्र धुरगुडे, मधुकर मोटे, बालाजी आडसूळ यांची नावे अग्रस्थानी असतील, असे बोलले जाते. असे असले ती राष्ट्रवादीची स्थानिक श्रेष्ठी काय निर्णय घेतात, हेही तितकेच महत्वाचे आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर होतील, असे सांगितले जात असतानाच शासनाने २१ सप्टेंबर रोजी निवडी घेण्याबाबत आदेशित केल्याने निवडीवेळी पक्षश्रेष्ठीचा चांगलाच कस लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही सदस्याची नाराजी परवडणारी नाही. नाराज सदस्यांची समजूत काढून योग्य त्या सदस्याला संधी देताना श्रेष्ठींना चांगलीच कसरत करावी लागणार, हे तितकेच खरे !