तळीरामांना मिळतोय बसस्थानकाचा आधार
By Admin | Updated: May 22, 2017 23:33 IST2017-05-22T23:32:21+5:302017-05-22T23:33:53+5:30
माजलगाव : येथील बसस्थानक परिसरात संपुर्ण अंधार असल्यामुळे याचा फायदा अनेकजण वेगवेगळया कारणांसाठी उचलत आहेत.

तळीरामांना मिळतोय बसस्थानकाचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील बसस्थानक परिसरात संपुर्ण अंधार असल्यामुळे याचा फायदा अनेकजण वेगवेगळया कारणांसाठी उचलत आहेत. दारुची दुकाने बंद असल्याने रात्रीच्या वेळी अनेक तळीराम येथे तळ ठोकून दारु पित बसल्याचे सर्रास आढळून येत आहेत. तसेच सर्वत्र अंधार असल्याने येथे आलेल्या प्रवाशी महिलांची छेडछाडीचे प्रकार बसस्थानकात वाढल्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजलगाव आगाराला मागील दोन वर्षांपासून कायमस्वरुपी आगार प्रमुख नसल्याने या ठिकाणचा कारभार बसस्थानकातील इतर कर्मचाऱ्याला सांभाळावा लागतो. त्यामुळे अधिकार मर्यादा येत असल्याने या ठिकाणच्या सोयीसुविधांकडे प्रभारी असलेल्या आगार प्रमुखाला लक्ष देता येत नाही. आगाराचा कारभार कसा चालवायचा तसेच आगारातील सुविधांबाबत कोणाशी व कसा पत्रव्यवहार करायचा याची माहिती नसल्यामुळे आगारात असलेल्या एक एक सुविधा बंद पडत चालल्या आहेत. त्यातच ज्या ठिकाणी प्रवाशी बसतात तेवढी जागा वगळता परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला आहे. सध्या शहरातील जवळपास सर्वच दारुची दुकाने ही बंद असल्यामुळे तळीरामांना दारू पिण्यासाठी इतरत्र जागा राहिलेली नाही. त्यामुळे ते बसस्थानकात असलेल्या अंधाराचा फायदा घेत आहेत. दारु पिण्यासाठी चक्क बसस्थानक परिसरात बारमध्ये बसल्याप्रमाणे गोल राऊंडने बसून दारु पिण्याचा नवीन फंडा चालू केला आहे. बसस्थानकाच्या आवारात मुख्य रस्त्यालगत अनेकांनी अतिक्र मणे करु न या ठिकाणी दुकाने थाटली आहेत या दुकानांमधून अनेकजण अवैधरीत्या दारु या तळीरामांना पुरवित आहेत. यामुळे तळीरामांसाठी जागे बरोबरच दारु उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी बसणा-यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.
लग्नसराईचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करीत असल्यामुळे रात्री प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. प्रवाशी महिलांना अंधारातच शौचास जाण्याची वेळ येत आहे. त्यातही काही तरुण महिलांची छेड काढताना पहावयास मिळतात. दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी पोलिसांना देखील चांगलाच चोप दिला. त्यामुळे शहर पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.