अंबाजोगाई तालुक्यात जलस्त्रोतांनी गाठला तळ

By Admin | Updated: July 7, 2014 00:08 IST2014-07-06T23:08:41+5:302014-07-07T00:08:46+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तालुक्यात जून महिना लोटला तरी पाऊस न झाल्याने पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे.

The base has reached the water level in Ambajogai taluka | अंबाजोगाई तालुक्यात जलस्त्रोतांनी गाठला तळ

अंबाजोगाई तालुक्यात जलस्त्रोतांनी गाठला तळ

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
तालुक्यात जून महिना लोटला तरी पाऊस न झाल्याने पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट तालुक्याला भेडसावत असून ठिकठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. तालुक्यात ७२ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
अंबाजोगाई तालुक्याचे खरीप हंगामाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ७४ हजार ८५३ हेक्टर आहे. यापैकी घाटनांदूर परिसरात १९३३ हेक्टर, बर्दापूर २६.६ हेक्टर, लोखंडी २५ हेक्टर, अंबाजोगाई १५ हेक्टर तर पाटोदा परिसरात कुठेही पेरणी झाली नाही. तालुक्यात केवळ १९९९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर तालुक्यातील उर्वरित ७२ हजार ८५४ हेक्टर क्षेत्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात एवढया मोठ्या प्रमाणात पेरण्या रखडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई व परिसरात होणाऱ्या अत्यल्प पावसामुळे अगोदरच या तालुक्याची स्थिती दुष्काळसदृश्य होती. त्यातच पुन्हा यावर्षीही पावसाने दडी मारल्याने शेत्तकरी हवालदिल झाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग व तीळ ही पिके आता उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी न झाल्यास हे पीकही पुन्हा संकटात सापडणार असल्याने शेतीचे काय? हा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे.
अंबाजोगाई तालुक्यात अत्यल्प पावसामुळे गेल्या तीन वर्षात अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाने तळ गाठल्याने अंबाजोगाईकरांना महिन्यातून केवळ दोन वेळाच पाणीपुरवठा होतो. तर ग्रामीण भागातही जलस्त्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागातील ५२ गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. ४२ गावांमध्ये ५३ विंधन विहिरी व विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र अधिगृहण केलेल्या या विहिरींनी तळ गाठल्याने पाणी प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. तालुक्यात ८३ हातपंप, १० विद्युत पंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. ज्याठिकाणी पाण्याची उपलब्धता असली तरीही भारनियमनामुळे आहे हे पाणी मिळणेही ग्रामस्थांसाठी दुरापास्त झाले आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जून, जुलै महिना मे पेक्षाही कडक उन्हाचा ठरू लागला आहे. येत्या आठवडाभरात पाऊस न झाला तर शेतकऱ्यांना दुष्काळ स्थितीचा मोठा सामना करावा लागणार आहे. याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण तालुक्यालाच मोठ्या तीव्रतेने भेडसावणार आहे.

Web Title: The base has reached the water level in Ambajogai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.