लाच घेणारी महिला पोलीस निलंबित
By Admin | Updated: June 29, 2014 00:36 IST2014-06-29T00:33:20+5:302014-06-29T00:36:36+5:30
बीड: पोलीस अधीक्षक कार्यालयात चारित्र्य प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले होते़

लाच घेणारी महिला पोलीस निलंबित
बीड: पोलीस अधीक्षक कार्यालयात चारित्र्य प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले होते़ शनिवारी त्यांना निलंबित करण्यात आले़
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बॅच, बिल्ला मिळविण्यासाठी शुभम नवनाथ नाईकवाडे याने स्वत:च्या व बहिणीच्या चारित्र्य प्रमाणपत्रासाठी जिल्हा विशेख शाखेतील चारित्र्य पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता़ यावेळी तेथील पोलीस कर्मचारी बबिता पाराजी भालेराव यांनी दोन प्रमाणपत्रांसाठी प्रत्येकी ३०० रुपये असे एकूण ६०० रुपये मागितले़ त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडले़ त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ दरम्यान, बबिता भालेराव यांना अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी तडकाफडकी निलंबित केले़
तीन दिवसांपूर्वीच
दिल्या होत्या सूचना
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी तीन दिवसांपूर्वीच जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक मारुती पंडित व तेथील कर्मचाऱ्यांना लोकांची कामे आडवू नका, नियमानुसार शुल्क घेऊन चारित्र्य प्रमाणपत्र द्या, असे बजावले होते; परंतु याउपरही प्रमाणपत्रासाठीची लाचखोरी थांबली नाही़ परिणामी, बबिता भालेराव सापळ्यात अडकल्या़(प्रतिनिधी)