‘बाप्पा’, पुढच्या वर्षी लवकर या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2016 03:06 IST2016-09-16T03:06:18+5:302016-09-16T03:06:18+5:30
आज मंगरुळपीर, मानोरा, अनसिंग येथे विसर्जन; गणरायाला भावपूर्ण निरोप, कुठेही अनुचित प्रकार नाही.

‘बाप्पा’, पुढच्या वर्षी लवकर या..
वाशिम, दि. १५- मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्या गणरायाला जिल्ह्यात दोन टप्प्यात निरोप देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात गुरुवारी वाशिम, रिसोड व कारंजा शहरात उत्साह व शांततेत विसर्जन झाले. ढोल-ताशांच्या निनादात व ह्यगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याह्ण, अशा जयघोषात बुद्धीदाता, विघ्नहर्ता गणरायाला शहरवासीयांनी जड अंतकरणाने निरोप दिला. ह्यगणपती बाप्पाह्णच्या घोषणांनी वत्सगुल्म नगरी दुमदुमून गेली होती.
५ सप्टेंबरला वाजत गाजत बाप्पांचे शहरात आगमन झाले होते. विनायकाच्या या उत्सवामुळे मागील १0 दिवसांपासून शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. गुरुवारी गणेश भक्तांनी या बाप्पाला निरोप दिला. सुरुवातीपासूनच ढोल-ताशांचा जल्लोष, उत्साहात नाचणारी भक्तमंडळी, गणेशोत्सव मंडळाचे लेजिम पथक, आखाड्याच्या लाठय़ाकाठय़ा खेळणार्या तरुणांच्या थरारक कवायती आणि ढोल-ताशांच्या धुमधडाक्यात एका मागोमाग गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.