बँकेचे ३३ लाख लुटण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:59:58+5:302014-12-09T01:01:05+5:30

वाळूज महानगर : बजाजनगरातील गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेले ३३ लाख ५० हजार रुपये

Bank tries to loot $ 3.3 million | बँकेचे ३३ लाख लुटण्याचा प्रयत्न

बँकेचे ३३ लाख लुटण्याचा प्रयत्न


वाळूज महानगर : बजाजनगरातील गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेले ३३ लाख ५० हजार रुपये आज दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला; परंतु बँक कर्मचाऱ्यांच्या धैर्य व सावधानतेमुळे हा प्रयत्न फसला. यामुळे औद्योगिक क्षेत्राच्याच सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. औरंगाबादमध्ये रात्री एटीएम फोडण्याचे अलीकडच्या काळात अनेक प्रयत्न झाले. येथे तर भर दुपारी लुटीचा प्रयत्न झाला.
गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात हे एटीएम आहे. नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी पैसे टाकण्यासाठी सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान आले. चारचाकी वाहन उभे करून एटीएममध्ये टाकण्यासाठी आणलेली ३३ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग घेऊन कस्टोडियन संदीप धामोडे, सुरक्षारक्षक हनीफ शाह आणि रमेश मोहिते हे तिघे जात होते. तेवढ्यात एका तरुणाने काळ्या रंगाची पल्सर गाडी त्यांच्यामधून घातली. गाडी आल्याने तिघांपैकी एक जण मागे राहिला. ही संधी साधून काळ्या रंगाचे जॅकेट, पँट व लांब केस असलेल्या दोन अनोळखी तरुणांनी झडप मारून एटीएम आॅफिसर व बंदूकधारी सुरक्षारक्षक यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बॅग हिसकावण्यास सुरुवात केली; परंतु आॅफिसर धामोडे यांनी बॅग सोडली नाही. ही थरारक खेचाखेच जवळपास ५ ते १० मिनिटे सुरू होती. हा प्रकार बघून गाडीतील चालक जगदीश तावडे व एटीएम आॅफिसर दिनेश सूर्यवंशी यांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी पळ काढला. ते अग्निशमन दल कार्यालयाच्या मागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. डोळ्यात मिरची पावडर गेलेल्या संदीप धामोडे, जगदीश तावडे व हनीफ शाह यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नेहमीप्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँकेकडून कोणीही तक्रार देण्यास आले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले.४
या चौकात हातगाडीवाले, टपरीचालक, मोबाईल शॉपी असे अनेक व्यावसायिक असल्याने हा चौक नेहमी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. भरदिवसा डोळ्यांसमोर हा प्रकार सुरू होता; परंतु कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही.
४कोणी मदतीला धावले असते तर हे चोरटे रंगेहाथ पकडले गेले असते; परंतु सर्वांनीच केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने चोरटे आरामात पसार होण्यात यशस्वी झाले. १
वाळूज औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चोऱ्या, लूटमार इ. गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात वाळूज एमआयडीसी पोलीस अपयशी ठरत आहेत. २
गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला असून संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचीच सुरक्षितता धोक्यात आली आहे.३
दिवसेंदिवस चोरी, लूटमारीच्या वाढत्या घटनांमुळे बजाजनगर, सिडको महानगर, वडगाव, पंढरपूर, वाळूज, जोगेश्वरी इ. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Bank tries to loot $ 3.3 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.