बंजारा समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 22, 2014 00:18 IST2014-08-22T00:09:09+5:302014-08-22T00:18:42+5:30
नांदेड : बंजारा समाजाला स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा क्रांती दलाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

बंजारा समाजाचा मोर्चा
नांदेड : बंजारा समाजाला स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा क्रांती दलाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ जुन्या मोंढ्यातून निघालेल्या या मोर्चात बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदविला होता़ तसेच थाळी-नगारा वाजवत आपल्या मागण्यांकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले होते़ भाजपासह मनसे, राष्ट्रवादीनेही आरक्षणाला पाठींबा दिला़
देशात विविध राज्यात बंजारा समाजाला विविध राज्यात एस़सी़ , एस़टी़, व्ही़जे़एऩटी़, ओबीसी प्रवर्गात वेगवेगळे आरक्षण आहे़ महाराष्ट्रातही बंजारा समाजास अनुसूचित जातीप्रमाणे केंद्र स्तरावर स्वतंत्र सूची तयार करून शासकीय नोकऱ्यात शैक्षणिक व राजकीय आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली़ बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देविदास राठोड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, चैतन्यबापू देशमुख, डॉ़ अजित गोपछडे, गोविंद राठोड, मनसेचे शिवा निरंगले, बहुजन मुक्ती पार्टीचे साहेबराव चव्हाण सहभागी झाले होते़ जुन्या मोंढ्यातून महावीर चौक मार्गे आलेला हा मोर्चा पोलिसांनी प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावरच अडविला़ काही वेळ मोर्चेकरी थांबलेही मात्र थोड्याच वेळात पोलिसांचा विरोध मोडून काढत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्र आले़ निवेदन दिल्यानंतर मार्गदर्शनही करण्यात आले़ राष्ट्रवादीचे आ़ शंकर अण्णा धोंडगे व मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार यांनी या मागणीला पाठींबा असल्याचे मोर्चात सहभागी होत सांगितले़ यावेळी बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष मारोती चव्हाण, भगवान राठोड, रामराव महाराज भाटेगावकर, बाबुराव जाधव, बळी राठोड, प्रल्हाद राठोड, सुनीता राठोड, राणी चव्हाण, मनोहर राठोड, संजय राठोड, शिवाजी राठोड, विजय पवार आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)