छत्रपती संभाजीनगर : शहरातील हॉटेल, ढाब्यांवर पश्चिम बंगालचे नागरिक सांगून बांगलादेशी नागरिक वेटर, कामगार म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पाेलिसांनी गुरुवारी सायंकाळी दौलताबाद रस्त्यावरील सिगडी ढाब्यावर छापा मारत १७ जणांना ताब्यात घेतले.
सध्या राज्यात सर्वत्र बांगगलादेशींच्या अवैध वास्तव्याचा मुद्दा गाजत आहे. नाशिक, मुंबई, पुणे, धुळ्यात याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांना हॉटेल, ढाब्यांवर बांगलादेशी नागरिक पश्चिम बंगालचे रहिवासी सांगून काम करून वास्तव्य करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या संशयावरून बगाटे यांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सिगडी हाॅटेलवर छापा टाकला. येथे १७ संशयित मिळून आले. त्या सर्वांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात आली. त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड जप्त करून हॉटेल मालकाच्या ताब्यात देण्यात आले. शिवाय, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना शहर न सोडण्याची नोटीस बजावण्यात आली.
ओळखपत्रांमध्ये तफावत१७ संशयितांमध्ये पश्चिम बंगालचे रहिवासी सांगत ५ ते ६ अल्पवयीन मुले देखील हॉटेलवर काम करताना आढळली. या सर्वांचे आधार कार्ड व अन्य ओळखपत्रावरील माहितीत तफावत आहे. यात दीपांकर साधु खान, रमजान मंडल, अलबॉक्स शेख अशी संशयित नावे आहेत. आधार कार्डची सखोल चौकशी करत असून त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल, असे बगाटे यांनी स्पष्ट केले.