कामकाजात केला फेरबदल
By Admin | Updated: July 13, 2014 00:20 IST2014-07-13T00:06:09+5:302014-07-13T00:20:30+5:30
परभणी : शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने स्वच्छता कामगारांच्या कामकाजात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, झोननिहाय स्वच्छता करण्याचे ठरविले आहे.

कामकाजात केला फेरबदल
परभणी : शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने स्वच्छता कामगारांच्या कामकाजात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, झोननिहाय स्वच्छता करण्याचे ठरविले आहे. शहरातील स्वच्छतेविषयी होत असलेली ओरड लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
परभणी शहरातील प्रभाग आणि वॉर्ड स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, परंतु मागील काही दिवसांपासून शहर स्वच्छता होत नव्हती. महानगरपालिकेने स्वच्छतेविषयीचे नियोजन लावताना प्रत्येक प्रभागात दोन कर्मचारी दिले होते. परंतु वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. सर्वसाधारण सभेतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत स्वच्छतेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
त्यानंतर महापौर प्रताप देशमुख, उपायुक्त दीपक पुजारी, उपायुक्त रणजीत पाटील यांनी बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन झोन निहाय स्वच्छतेची कामे करण्याचा निर्णय घेतला. परभणी शहरात तीन प्रभाग समिती असून, या प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी दोन झोन आहेत. त्यामुळे झोननिहाय स्वच्छतेची कामे हाती घेतल्यास कमी वेळेत जास्तीत जास्त स्वच्छता होईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच सध्या सणांचे दिवस असल्याने व पावसाळा असल्याने सकाळ व दुपार अशा दोन सत्रात स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकत्रित करुन स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छता कामगारांच्या कामाकाजात अशा पद्धतीने फेरबदल करण्यात आला आहे. शहरात १४४ स्वच्छता कर्मचारी असून, त्यात ६८ महिला कर्मचारी आहेत. खासगी कंत्राटदाराकडे २८ कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन स्वच्छता केली जाणार आहे.
७ ट्रॅक्टर आणि ३ टेम्पोच्या साह्याने कचरा उचलण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
१०० जणांना नोटिसा
हॉटेल्स आणि पानपट्टीमध्ये पाणीपाऊच विक्री केले जाते. मागील काही दिवसांपासून पाणीपाऊच विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. परंतु रिकामे झालेले पाणीपाऊच त्याच परिसरातील नाल्यांमध्ये टाकले जात आहे. त्यामुळे नाल्या पाणीपाऊचने भरल्या असून, घाण साचून तुंबल्या आहेत. त्यामुळे नालीमध्ये पाणीपाऊच टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी १०० जणांना नोटिसा दिल्या असल्याची माहितीप्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली.
गावठाण भागाला प्राधान्य
परभणी शहरातील गावठाण भागात स्वच्छतेला प्राधान्य दिले असून, गुजरी बाजार, गोरक्षण, कच्छी बाजार, गांधी पार्क, शिवाजी चौक, सुभाष रोड आदी ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर ४० कर्मचाऱ्यांच्या साह्याने स्वच्छता केली जाणार आहे.
...तर होणार कारवाई
शहरातील अनेक वसाहतींमध्ये बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असते. हे बांधकाम साहित्य रस्त्याच्या बाजूला करुन घ्यावे, अन्यथा ते जप्त करण्यात येईल. तसेच बांधकाम साहित्यामुळे अपघात झाल्यास या अपघाताला बांधकाम साहित्याच्या मालकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.