बनावट कागदपत्राच्या आधारे घर बळकावण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:47 IST2017-07-28T17:44:10+5:302017-07-28T17:47:15+5:30
बनावट कागदपत्राच्या आधारे एका महिलेचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत तिला मारहाण केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

बनावट कागदपत्राच्या आधारे घर बळकावण्याचा प्रयत्न
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद. दि. २८ : घरमालक जवळ राहत नसल्याचे पाहून बनावट कागदपत्राच्या आधारे एका महिलेचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत तिला मारहाण केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जुमानहिलाबी चाऊस, सबा जुमान चाऊस आणि अगबान खालेद चाऊस (सर्व रा.इंदीरानगर,गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.
याविषयी जवाहरनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजनगाव शेणपुंजी येथील आशाबाई प्रदीपकुमार लोहाडे यांच्या मालकीचे इंदीरानगर गारखेडा येथे घर आहे. त्यांनी हे घर आरोपींना गतवर्षी भाड्याने दिले होते. घरमालक इंदीरानगर येथे राहात नसल्याचे पाहुन आरोपींनी ते घर बळकावण्याचा कट रचला. घराची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. यानंतर आम्ही हे घर खरेदी केल्याचे शेजा-यांना सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. ही बाब घरमालक लोहाडे यांना कळताच त्यांनी आरोपींना घर खाली करण्यास सांगितले. यावर आरोपींनी घर आमचे आहे असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत घर खाली करण्यास नकार दिला.
हे घर तुम्हीच विक्री केल्याचे त्यांनी लोहाडे यांना सांगितले. आरोपीं बनावट कागदपत्राच्या आधारे आपले घर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोहाडे यांच्या लक्षात आले. याची विचारणा करताच आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर लोहाडे यांनी त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. आर. आहेर हे तपास करीत आहेत.