कामचुकार तलाठ्यांना नोकरशाहीचे अभय

By Admin | Updated: July 4, 2014 00:21 IST2014-07-03T23:53:20+5:302014-07-04T00:21:51+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश तलाठी हे शहराच्या ठिकाणी राहूनच संबंधित सज्जाचा कारभार पाहत असल्याचे ‘लोकमत’ने २५ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले होते.

Bamboo abduction | कामचुकार तलाठ्यांना नोकरशाहीचे अभय

कामचुकार तलाठ्यांना नोकरशाहीचे अभय

हिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश तलाठी हे शहराच्या ठिकाणी राहूनच संबंधित सज्जाचा कारभार पाहत असल्याचे ‘लोकमत’ने २५ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले होते. या नंतर कामचुकार तलाठ्यांवर कारवाई होईल, असे सुतोवाच जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी केले होते; परंतु या तलाठ्यांना आता महसूल विभागातील नोकरशाहीकडूनच अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांना विविध कामांसाठी तलाठ्यांकडून प्रमाणपत्रे आवश्यक असतात. शिवाय शैक्षणिक वर्षालाही सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांनाही विविध प्रमाणपत्रांची गरज असते. या प्रमाणपत्रांसाठी तलाठीच विद्यार्थी व शेतकऱ्यांना भेटत नसल्याने त्यांचे हाल होत असल्याची तक्रार ‘लोकमत’कडे करण्यात आल्यानंतर २५ जून रोजी जिल्ह्यातील ७९ गावांमध्ये ‘लोकमत’च्या वतीने तलाठ्यांच्या मुख्यालयी उपस्थिती बाबत स्टिंग आॅपरेशन करण्यात आले होते. त्यामध्ये तीन ते चार ठिकाणचे तलाठी वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचे दिसून आले होते. अनेक तलाठी अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्याच्या ठिकाणाहून तसेच तालुक्याच्या ठिकाणी राहून संबंधित सज्जाचा कारभार पाहत असल्याचे निदर्शनास आले होते. ‘लोकमत’च्या या स्टिंग आॅपरेशनचे जिल्हाभरातील शेतकरी व विद्यार्थ्यांनी स्वागत केले. या प्रकरणी कामचुकार तलाठ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे २६ जून रोजी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले होते. त्यानंतर या संदर्भात कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जून रोजी उपविभागीय व तहसीलदारांना पत्र पाठवून आदेश दिले होते. दोन दिवसांत या बाबतचा अहवाल सादर करावा, असेही या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कारवाई होईल, अशी अपेक्षा होती; परंतु निर्ढावलेल्या नोकरशाहीत याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. तब्बल आठ दिवसानंतरही या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला एकाही तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांने उत्तर दिलेले नाही. या बाबत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतली असता ही बाब समोर आली. या संदर्भात कळमनुरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे २७ जूनचे पत्र आपणाला मिळालेच नसल्याचे सांगितले. तलाठ्यांचे मुख्यालयी उपस्थितीबाबतचे वेळापत्रक व कामचुकार तलाठ्यांवरील कारवाईचा निरोप ३ जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्याकडून फोनवर मिळाला असल्याचे चिकुर्ते म्हणाले.
याबाबत हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्र मिळाले असून या बाबत हिंगोली व सेनगाव तहसीलदारांकडून अहवाल मागविला होता. सेनगाव तहसीलदारांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हिंगोली तहसीलदारांचा अहवाल मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर उद्या (शुक्रवारी) जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला जाईल, असे सांगितले. या बाबत वसमत येथील उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकमत’मध्ये २६ जून रोजी स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने तलाठ्यांची बैैठक घेतली. या बैैठकीत तलाठ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीचे वेळापत्रक सादर करण्यास तसेच कामचुकार तलाठ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदारांना आदेश दिले होते, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांचे २७ जूनचे पत्र मिळाले; परंतु याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नोकरशाहीचा लालफितीच्या कारभाराचा सातत्याने शेतकऱ्यांना फटका बसत असला तरी अधिकारी मात्र गंभीर नसल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारीही का लक्ष देत नाहीत? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तलाठ्यांचे कामकाज सुधरेना
‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर दोन ते तीन दिवस कामचुकार तलाठ्यांनी मुख्यालयी राहून बऱ्यापैकी काम केले; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीप्रमाणे कानाडोळा केल्याचे दिसून येताच पुन्हा तीच री ओढण्यास सुरूवात केली. त्यामुळे चालू आठवड्यात पुन्हा अनेक तलाठी मुख्यालयी आल्याचे ग्रामस्थांना पहावयास मिळाले नाही. याचा प्रत्ययही तहसील कार्यालयांमधून दिसून येत आहे. गुरूवारी हिंगोली तहसील कार्यालयात पेडगाव येथील एक शेतकरी आला होता. पेडगावचे तलाठी कोठे भेटतात? याची चौकशी तो करीत होता. पेडगाव येथील तलाठी सय्यद हे गेल्या अनेक दिवसांपासून गावात आले नाहीत, शिवाय त्यांचा फोनवरून प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे काय करावे? हे कळत नाही, असा हताश सवाल त्यांनी केला.
तलाठ्यांच्या मुख्यालयाचे वेळापत्रक तयार होईना
जिल्ह्यातील तलाठ्यांची मुख्यालयी उपस्थिती तपासण्याच्या दृष्टीकोणातून ‘लोकमत’ने २५ जून रोजी केले होते स्टिंग आॅपरेशन.
सज्जा ऐवजी जिल्ह्यातील अनेक तलाठी शहराच्या ठिकाणी राहूनच करीत आहेत कारभार.
कागदपत्रांसाठी तलाठ्यांचा शोध घेतांना ग्रामस्थांच्या येते नाकीनऊ
२७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांचे मुख्यालयाचे वेळापत्रक व कामचुकार तलाठ्यांवर कारवाईचे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते आदेश.

Web Title: Bamboo abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.